तिरंगी मालिकेसाठी हिंदुस्थानच्या महिला संघाची घोषणा, तीन नवीन खेळाडूंना संधी

एप्रिल महिन्याच्या अखेरिस सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियच्या महिला संघाची BCCI ने घोषणा केली आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये तिरंगी मालिका रंगणार आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून उपकर्णधारपदी स्मृती मनधनाची निवड करण्यात आली आहे.

तिरंगी लढतीतील पहिला सामना 27 एप्रिल रोजी टीम इंडिया आणि श्रीलंका या संघांमध्ये कोलंबो येथील आर. प्रेमदास इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी ही तिरंगी मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे संघात अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. प्रतिका रावल, हरलीन देओल आणि जेमिमा यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून रिचा घोष आणि यस्तिका भाटिया यांना संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीन नवीन खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे. दिल्ली कॅपिटल्सची फिरकीपटू श्री चरणी, गुजरात टायटन्सची वेगवान गोलंदाज काशवी गौतम आणि वेगवान गोलंदाज शुची उपाध्याय यांचीही संघात निवड झाली आहे. श्री चरणी (4 विकेट) आणि काशवी गौतमी (11 विकेट) यांनी आपल्या दमदार खेळाची झलक WPL मध्ये दाखवली आहे. त्याचबरोबर शुची उपाध्याय हीनेही चॅलेंजर ट्रॉफीमध्ये 18 विकेट घेत BCCI ला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.

तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय