बीसीसीआयनं तिजोरी उघडली, टीम इंडियाचे चॅम्पियन्स खेळाडू मालामाल होणार, ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस जाहीर

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. त्याआधी टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवरही मोहोर उमटवली होती. गेल्या 9 महिन्यात दोन आयसीसी स्पर्धा जिंकलेल्या टीम इंडियासाठी आता बीसीसीआयनेही तिजोरी उघडली असून घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे चॅम्पियन्स खेळाडूंसह प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे सदस्यही मालामाल होणार आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने एकही सामना न गमावता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याआधी टी-20 वर्ल्डकपमध्येही अजय राहत टीम इंडियाने जेतेपद पटकावले होते. यामुळे टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता बीसीसीआयने टीम इंडियावर धनवर्षावही केला असून तब्बल 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ही घोषणा केली.

लागोपाठ आयसीसी स्पर्धा जिंकणे विशेष असून हे बक्षीस जागतिक स्तरावर टीम इंडियाच्या समर्पणाची आणि उत्कृष्टतेची पावती आहे. यंदाच्या वर्षी आधी आपण अंडर-19 महिला वर्ल्डकप जिंकला आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉ़फीवर मोहोर उमटवली. हा चढता आलेख आपल्या देशातील क्रिकेटची मजबूत परिसंस्था अधोरेखित करते, असे रॉजर बिन्नी म्हणाले.

कुणाला मिळणार किती पैसे?

बीसीसीआयने 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे यातील किती पैसे कुणाला मिळणार हा प्रश्न केला जात आहे. अर्थात बीसीसीआयने याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र ही रक्कम खेळाडू, प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्यांमध्ये विभागून दिली जाईल. यातील मोठा वाटा खेळाडूंच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर मिळालेले 19 कोटी

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाला तगडे बक्षीस मिळाले होते. आयसीसीकडून टीम इँडियाला 2.24 मिलियन डॉलर अर्थात 19.48 कोटी रुपये मिळाले होते. तर रनरअप राहिलेल्या न्यूझीलंडला 1.12 मिलियन अर्थात जवळपास 9.74 कोटी रुपये मिळाले होते.