खंबीर हिंदुस्थानचा गुरू गंभीर, साडेतीन वर्षांसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षकपद 

गेले काही दिवस क्रिकेटप्रेमींना ज्या बातमीची आतुरता होती ती आज बीसीसीआयने संपवली. टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जिंकून खंबीर बनलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला जगज्जेत्या गौतम गंभीरसारखा मुख्य प्रशिक्षक लाभला आहे. आगामी श्रीलंका दौऱयापासून गंभीर संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असून पुढील साडेतीन वर्षे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो संघाचा गुरू असेल.
टी-20 वर्ल्ड कपला हिंदुस्थानी संघ जाण्यापूर्वी राहुल द्रविडच्या उत्तराधिकारीचा शोध बीसीसीआयने सुरू केला होता. यासाठी अनेक दिग्गजांनी प्रशिक्षकपदाचे अर्जही भरले आणि मुलाखतीही दिल्या. तेव्हाच हिंदुस्थानला 2007 साली टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱया संघाचा धडाकेबाज सलामीवीर गौतम गंभीरचे नाव सर्वात आघाडीवर होते. मात्र बीसीसीआयने प्रशिक्षकाचे नाव जाहीर करण्यास काहीसा विलंब केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर आज बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ‘एक्स’वरून गंभीर यांच्या नावाची घोषणा करत जगज्जेत्या संघाला जगज्जेता गुरू देण्याची किमया साधली.
श्रीलंका दौऱ्यापासून गुरूगिरी 
सध्या हिंदुस्थानचा युवा संघ झिम्बाब्वेच्या छोटेखानी दौऱयावर असून त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि 3 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपासून गौतम गंभीर अधिकृतपणे संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळेल. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकाची जुलै 2024 पासून डिसेंबर 2027 या साडेतीन वर्षांसाठी नियुक्ती जाहीर केली असली तरी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड, पारस म्हांब्रे  आणि टी. दिलीप यांच्याबाबत आपला कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही सहाय्यक त्रिमूर्ती कायम असेल की त्यांच्या जागीही नवे सहाय्यक निवडले जातील, हे अद्याप अस्पष्ट आहे.
गंभीरची दमदार कामगिरी 
गौतम गंभीर 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 च्या वन डे वर्ल्ड कप संघात असलेला खेळाडू. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात झंझावाती खेळय़ा करत त्याने संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. 2012 आणि 2014 च्या आयपीएल मोसमात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद जिंकून देण्याची कामगिरी.
गंभीरपुढील आव्हाने 
– हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकपद गंभीरसाठी काटेरी मुकुटासमान असेल. तापट स्वभावाच्या गंभीरचे आयपीएलदरम्यान हिंदुस्थानच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंशी खटके उडाल्याची उदाहरणे आहेत. त्यात विराट कोहलीशी असलेला वाद जगजाहीर आहे. त्यामुळे गंभीरला हे वाद सामोपचाराने संपवावे लागतील.
– टी-20 फॉरमॅटमधून शर्मा-कोहली-जाडेजाच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढावी लागेल. त्यांचे पर्याय शोधण्यासाठी प्रयोग करावे लागतील.
कसोटी अजिंक्यपद आणि आयसीसी वर्ल्ड कप जिंकून देणे
हिंदुस्थानचा संघ सलग दोनदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचूनही उपविजेताच राहिलाय. हिंदुस्थानला कसोटीचा हा सन्मान मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी गंभीरवर असेल. तसेच गेली 13 वर्षे आयसीसी वर्ल्ड कप जेतेपदाचे स्वप्नही पूर्ण करण्यासाठी गंभीरला स्वतःला झोकून द्यावे लागणार आहे. हिंदुस्थानकडे जसप्रीत बुमरा वगळता एकही धारदार गोलंदाज नाही. त्यामुळे गोलंदाजांचा तोफखाना तयार करण्याची जबाबदारीही त्याच्यावरच असेल.