सोलापूर बाजार समिती निवडणूक; भाजपमध्ये धुसफूस, विजय देशमुखांना डावलून; सुभाष देशमुखांनी 2 आमदारांसह घेतली बैठक

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमधील धुसफूस वाढली असून, बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार विजय देशमुख व आमदार सुभाष देशमुख हे पुन्हा समोरासमोर उभे ठाकले आहेत. यंदा सुभाष देशमुख यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांची साथ मिळत असल्याने बाजार समितीची निवडणूक हायव्होल्टेज होणार असल्याचे चित्र आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. सध्या बाजार समितीवर आमदार, माजी मंत्री विजय देशमुख यांचा एकछत्री अंमल असून, ते विद्यमान सभापती आहेत. गेल्या निवडणुकीत बाजार समितीवर विजय देशमुख यांनी सर्वपक्षीय मोट बांधून पक्षांतर्गत विरोधक सुभाष देशमुख पॅनलचा धुव्वा उडवला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आमदार देशमुख यांनी आतापासूनच बाजार समिती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, शहर मध्यमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपचे ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री, विद्यमान सभापती विजय देशमुख यांना डावलून झालेल्या या बैठकीने भाजपात खळबळ उडाली आहे. यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची साथ लाभत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या एका आमदाराविरुद्ध तीन आमदारांनी शड्डू ठोकल्याने हायव्होल्टेज ड्रामा होणार हे निश्चित आहे, अशी चर्चा सुरू आहे.

या बैठकीत सुभाष देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक आपण लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, असे खुले आव्हान देशमुखांना दिले. या बैठकीस आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉ. यनगोंडा हविनाळे, शिरीष पाटील, अण्णाराव बाराचारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.