प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर; 55 कोटी भाविकांचे स्नान

महाकुंभ पर्वाच्या समाप्तीसाठी अवघे 8 दिवस शिल्लक राहिल्याने प्रयागराजमध्ये भाविकांच्या गर्दीचा अक्षरशः महापूर आला आहे. संगममध्ये बोटीच बोटी दिसत असून रस्तेही प्रचंड वाहतूकोंडीमुळे जाम असल्याचे चित्र आहे. आज दुपारपर्यंत 69 लाख भाविकांनी पवित्र स्नान केले, तर 37 दिवसांत आतापर्यंत तब्बल 55.31 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.

आज अभिनेत्री जुही चावलानेही गंगास्नान केले. ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम सकाळ असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. महाकुंभला लागून असलेल्या नैनी नया पूल, फाफा माळ आदी भागात 10 ते 15 किलोमीटर भागात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूककोंडी होत आहे. आजही मोठय़ा संख्येने भाविक आल्याने वाहतुककोंडी झालेली दिसली. प्रयागराज जंक्शनवरही गर्दी वाढत आहे. येथून भाविक पायी चालत संगमला जात आहेत. मर्यादित प्रवासी वाहने सुरू आहेत. मात्र या वाहनांमध्ये प्रति व्यक्ती तब्बल 300 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे.

अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद

महापुंभात अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचे दिसले. एसडीआरएफ जवानाचे काही व्हीआयपी पाहुणे आले होते. अधिकारी विवेक चतुर्वेदी यांनी नकार दिल्यानंतरही एसडीआरएफच्या कर्मचाऱयांनी त्या पाहुण्यांना संगमला घेऊन जाण्यास सुरुवात केली. या मुद्दय़ावरून वाद झाला. किरकोळ हाणामारीही झाली, परंतु नंतर वाद मिटला.

महापुंभ मृत्युपुंभ बनला -ममता बॅनर्जी

हा मृत्युपुंभ आहे. मी महापुंभाचा आदर करते, मी पवित्र गंगामातेचा आदर करते; परंतु तिथे कोणतीही व्यवस्था नाही. श्रीमंत, व्हीआयपींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या तंबूंची तरतूद आहे. मात्र, गरीबांसाठी कुंभमेळय़ात कोणतीही व्यवस्था नाही. कुंभमेळय़ात चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. हे रोखण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना आखल्या, असा सवाल करत महाकुंभातील आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना मोदी सरकार आणि योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली.