
स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरीच्या बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली बंद होत्या. त्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रिफायनरी बारसूमध्येच होणार असे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री इतक्यावरच थांबलेले नाहीत, तर त्यांनी हा रिफायनरी प्रकल्प उभारणाऱया सौदी अराम्को या पंपनीबरोबर वाटाघाटीही सुरू केल्या आहेत. उच्चपदस्थांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्थानिकांच्या माथी मारला जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
बारसू या गावात हा प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे; परंतु स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात जोरदार लढा दिल्याने तो कुणालाही पुढे रेटता आला नाही. विरोध होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारणाऱया सौदी अराम्को या कंपनीने समुद्रकिनारा असलेल्या गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांबरोबर बोलणी सुरू केली आहेत. मात्र हा प्रकल्प इतर कुठेही जाऊ न देता बारसूमध्येच उभारणार, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात एकच मोठा प्रकल्प उभारणे अवघड असल्याने महाराष्ट्रासह आंध्र किंवा केरळ किंवा अन्य राज्यांमध्ये तीन प्रकल्प सुरू करण्याचा राज्य व केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासंदर्भात सौदी अराम्को कंपनीबरोबर बोलणीही सुरू आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले आहे. बारसूच्या सडय़ावर जिथे प्रकल्पाची जागा ठरली आहे तेथील मातीची चाचणीही करण्यात आली होती. तिचा अहवाल सकारात्मक आला असून तिथे प्रकल्प उभारण्यात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केल्याचे कळते.