पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांकरिता आमच्याकडे जमीन नाही, बारसूवासीयांचा निर्धार

कोकणातील उत्पादनांवर आधारित पूरक उद्योगांकरिता नक्कीच जमीन देऊ, परंतु कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रिफायनरीसारख्या प्रकल्पांकरिता आमच्याकडे जागा नाही, अशी भूमिका बारसू सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरीविरोधी संघटनेने मांडली आहे. कोकणवासीयांचा विरोध धुडकावून लावत हा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला.

बारसू आणि आजूबाजूच्या गावातील साधारण आठ एकर जमिनीची खरेदी एमआयडीसीकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता रिफायनरीला देण्यात येऊ नये, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आमची जमीन कोकणातील काजू, आंबा, फणस, सुपारी, नारळ या उत्पादनांना पूरक ठरतील अशा उद्योगांकरिता वापरण्यास आमची काहीच हरकत नाही. अशा उद्योगांकरिता आम्ही हवी असल्यास आणखी जमीन देऊ, परंतु रिफायनरीसारख्या कोकणच्या पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रकल्पांना आमचा विरोध राहील, अशी भूमिका संघटनेचे काशीनाथ गोर्ले यांनी ‘सामना’शी बोलताना मांडली.

बारसूमध्ये रिफायनरी आणण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविताच बारसू सोलगावसह आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी सोमवारी एकत्र येत पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम बारसूमध्ये मोठी सभा घेतली जाईल. त्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांची भेट घेऊन प्रकल्पाविरोधात भूमिका मांडली जाईल. त्यानंतही हा प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोर्ले यांनी दिला. येथील मच्छीमार संघटना, शाश्वत कोकणसारख्या संस्थांचा पाठिंबा आम्हाला आहे, असे गोर्ले यांनी सांगितले.