हिंदुस्थानी नागरीकांविरोधात पोस्टद्वारे द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीचे अकाऊंट “X” ने केले निलंबित

पूर्वीचे ट्विटर आणि आताचे “X” हँडलवर युजर्सना स्वत: ची स्वतंत्र मते मांडता येतात. त्यावर भाषा अथवा कंटेटवर कोणतेही प्रबंध नसल्याने अनेक वापरकर्ते त्यावर आपली मते बिनधास्त मांडू शकतात. काही वापरकर्ते विरोधकांवर टीका करण्यासाठी त्याचा वापर करतात. तर काही समाज प्रबोधन करतात. मात्र यापैकी काही वापरकर्ते “X” वरील स्वातंत्र्याच्या गैरफायदा घेत द्वेष भावनेने पोस्ट टाकतात. अशा वापरकर्त्यांची तक्रार केल्यास त्यांचे अकाउंट निलंबित केले जाते अथवा त्यांना काही काळाकरीता बॅन केले जाते. आता अशाच एका अनोळखी व्यक्तीचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. हिंदुस्थानी नागरिकांविरूद्ध द्वेषयुक्त भावनेने पोस्ट शेअर करणाऱ्या बॅरी स्टॅन्टन नावाच्या व्यक्तीचे “X” हँडल सस्पेंड करण्यात आले आहे.

1.8 लाखांहून अधिक फॉलोअर्सचे व्हेरिफाईड अंकाऊंट असलेला असलेला बॅरी स्टॅन्टन ही व्यक्ती त्याच्या “X” अकाऊंटवरून अनेकदा वर्णद्वेषी, वंशवादी पोस्ट, व्यंगचित्रे शेअर करत असे. या पोस्टमध्ये हिंदुस्थानी उघड्यावर शौचास बसतात. किंवा हिंदुस्थानींना पश्चिमेकडील पांढऱ्या शेजाऱ्यांपासून कसे दूर पळवायचे यावरील कंटेटचे कौतुक करणारे पोस्ट होत्या. तसेच हिंदुस्थानींना दुर्गंधीयुक्त म्हणणे किंवा अपशब्द वापरणे यासारख्या गोष्टी वारंवार होत होत्या.

गेल्या दोन आठवड्यांपासून त्याच्या अकाऊंटवरील पोस्टचे प्रमाण वाढले होते. केवळ हिंदुस्थानीच नव्हे तर, ज्यू आणि आफ्रिकन लोकांविरूद्ध देखील अनेक द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद पोस्ट शेअर करत असे. वंश, वांशिकता, राष्ट्रीयत्वावरून लोकांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तक्रारी दाखल केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने “X” चे मालक इलॉन मस्क यांना देखील सामोरे जावे लागले आहे. समुदाय मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांचे खाते देखील निलंबित करण्यासाठी वापरकर्त्यांकडून दबावाचा सामना करावा लागला होता.