बडोदा-जेएनपीए महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांना बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये मिंधे गटाचे पदाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे व अजित पवार गटाचे पदाधिकारी, नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचा समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या चौघांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने निघालेला सुमारे एक कोटी रुपयाचा मोबदला आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळता करून घेतला आहे.
बदलापूरच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या बडोदा-जेएनपीए महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती. या भूसंपादनात 10 आदिवासी जागामालकांच्या बँक खात्यात आलेले 74 लाख 50 हजार रुपये सुरेश टोकरे, भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे चौघांनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते करून घेतले. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून या चौघांचीही उचलबांगडी केली आहे. आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कटात आणखी 5 ते 6 आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे, असे कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सांगितले. दरम्यान या कटात काही तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांनी छेडले होते आंदोलन
बडोदा-जेएनपीए महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 2021 ते 2023 या कालावधीत मोबदला दिल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र आपल्या खात्यात पैसे न आल्यामुळे शेतकरी चक्रावले होते. आपला मोबदला परस्पर दुसऱ्याच खात्यात जमा झाल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांचा मोबदला या चौघांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी या चौघांच्याही मुसक्या आवळल्या