बरहानी टेस्फेने जिंकली मुंबई मॅरेथॉन, एरीट्रियाने इथिओपियाचे वर्चस्व मोडीत काढले

>>मंगेश वरवडेकर

मुंबई मॅरेथॉन म्हणजे इथिओपिया-केनियाचे वर्चस्व, पण यंदा एरीट्रिया नावाच्या पूर्व आफ्रिकेतील देशाने या दोघांचे वर्चस्व मोडून काढत मुख्य मॅरेथॉन जिंकण्याचा पराक्रम केला. एरीट्रियाच्या बरहानी टेस्फेने अनपेक्षितपणे 2 तास 11 मिनीटे 44 सेपंद देत मुंबई मॅरेथॉन जिंकली, तर त्यांच्याच देशाचा मरहारी केसेटने 6 सेपंद जास्त वेळ देत दुसरे स्थान पटकावले. मात्र महिलांच्या मॅरेथॉनमध्ये केनियाची जॉयस चेपकेमोई अव्वल ठरली तर बहरीनच्या शिताय इशेटने बाजी मारली. हिंदुस्थानी गटात अनिश थापा (पुरुष) आणि  निरमाबेन ठाकोर (महिला) यांनी अव्वल स्थान संपादले.

विकासकामांमुळे गेली अनेक वर्षे मुंबई मॅरेथॉन अडथळय़ांची शर्यत असायची, पण यंदा मॅरेथॉनचे मार्ग अडथळय़ांपासून मुक्त झाले. मात्र मुंबईच्या तापमानाने पहाटे तिशी गाठल्यामुळे आज धावपटूंचा चांगलाच घामटा निघाला. नेहमीप्रमाणे मुंबई मॅरेथॉनचा नवा विक्रम प्रस्थापित केला जाईल, अशी सर्वांना अपेक्षा  होती. पण लढतीची वेळ खूपच चुकीची ठरली. स्पर्धेत केनिया-इथिओपियाचे 15 तर एरीट्रिया केवळ 2 धावपटू सहभागी झाले होते. सर्वांच्या वेळा 2 तास 10 मिनिटांपेक्षा कमी होत्या, पण मुंबईच्या गरमागरम वातावरणामुळे कुणालाही आपल्या सर्वोत्तम वेळेच्या आसपासही वेळ देता आली नाही.

z हिंदुस्थानचे वर्चस्व वाढतेय

आधी हिंदुस्थानचे धावपटू मुंबई मॅरेथॉनच्या टॉप टेनमध्येही येत नव्हते. मात्र यावेळी अनिश थापा आणि मान सिंग या दोघांनी सातवा आणि आठवा क्रमांक पटकावला. एवढेच नव्हे तर टॉप 20 खेळाडूंमध्ये हिंदुस्थानचे 11 खेळाडू होते. यावरून मुंबई मॅरेथॉनवर हिंदुस्थानी पुरुषांचे वर्चस्व वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थानी गटात अव्वल आलेल्या श्रीनु बुगाथाला आपली गेल्या वेळची कामगिरी साधता आली नाही. तो हिंदुस्थानी गटात पाचवा आला.

z पूर्ण मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी महिला मागे

महिलांच्या मॅरेथॉनमध्ये इथियोपियाचेच वर्चस्व दिसले. हिंदुस्थानच्या एकीलाही अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आले नाही. विजेत्या जॉयस चेपकेमोईने (केनिया) 2 तास 24 मिनिटांची वेळ दिली, तर हिंदुस्थानच्या अव्वल निरमाबेन ठाकोरला 2 तास 50 मिनिटे 6 सेपंद वेळ लागला. म्हणजेच जॉयस जिंकली तेव्हा निरमा 7 ते 8 किमी मागे होती. महिलांच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये पहिले दोन स्थान वगळता उर्वरित आठ क्रमांकावर इथियोपियाच्या महिला जिंकल्या.

z पिकनिक मूड अर्ध मॅरेथॉनपटू

ड्रीम रनमध्ये धावणारे सारेच पिकनिक मूडमध्ये असतात, पण आता अर्ध मॅरेथॉनमध्येही त्याच मूडमध्ये धावणाऱया धावपटूंची संख्या हजारात आहे. चालता बोलता पह्टो सेशन्स करत-करत धावणारे पुरुष आणि महिला धावपटू आरामात शर्यत पूर्ण करत होते. या धावपटूंनी चार तासांत हसत खेळत 21 किमीचा टप्पा गाठला.

z सर्वांना मिळाले मेडल्स

गेल्या वर्षी सहा तासांपेक्षा अधिक वेळ घेत 42 किमीचे अंतर गाठणाऱया शेकडो मॅरेथॉन धावपटूंना मेडल्सविना परतावे लागले होते, मात्र यावेळी त्या गोंधळाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रोपॅमने खबरदारी घेतली. त्यामुळे यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि शर्यत पूर्ण करणाऱया हौशी धावपटूंना गळय़ात मेडल्स घालून मिरवताना पाहायला मिळाले. गेल्या मॅरेथॉनमध्ये हजारो मेडल्सचे बॉक्स गहाळ झाले होते.

टेस्फेची धक्कादायक आघाडी

मुंबई मॅरेथॉनची शर्यत सुरू झाल्यानंतर अव्वल 17 धावपटूंचा जथा एकाच वेगान धावत होता. यात इथिओपियाचेच अधिक खेळाडू होते. हा संघर्ष शेवटचे चार किमी अंतर शिल्लक असेपर्यंत तसाच होता. पण जसजशी अंतिम रेषा जवळ येऊ लागली तेव्हा एरीट्रियाच्या टेस्फे आणि केसेटने आघाडी घेतली. या संघर्षात इथिओपियाचा दिमेकही त्यांच्याच वेगाने धावत होता, पण शेवटी एरीट्रियाने बाजी मारली आणि मुंबईकरांना पहिल्यांदाच इथिओपियाचा शेजारी असलेल्या एरीट्रिया या देशाचे नाव ऐकायला मिळाले.

मुंबई मॅरेथॉन 2025 चा निकाल

मुख्य मॅरेथॉन (पुरुष)

  1. बरहानी टेस्फे (एरीट्रिया) 2ः11ः44
  2. मरहारी केसेट (एरीट्रिया) 2ः11ः50
  3. टेस्फे दिमेक (इथियोपिया) 2ः11ः56
  4. फिलमन रोनो (केनिया) 2ः12ः09
  5. अब्दी फुफा (इथियोपिया) 2ः11ः44

मुख्य मॅरेथॉन (महिला)

  1. जॉयस चेपकेमोई (केनिया) 2ः24ः56
  2. शिताय इशेट (बहरीन) 2ः25ः29
  3. मेदिना अरमिनो (इथिओपिया) 2ः27ः58
  4. निगस्ती हाफतू (इथिओपिया) 2ः28ः29
  5. शेवारगी टागेल (इथिओपिया) 2ः29ः34

मुख्य मॅरेथॉन (पुरुष- हिंदुस्थान)

  1. अनिश थापा (हिंदुस्थान) 2ः17ः23
  2. मान सिंह (हिंदुस्थान) 2ः17ः37
  3. गोपी थोनाकल (हिंदुस्थान) 2ः19ः59
  4. कालिदास हिरवे (हिंदुस्थान) 2ः20ः28
  5. श्रीनु बुगाथा (हिंदुस्थान) 2ः20ः43

मुख्य मॅरेथॉन (महिलाहिंदुस्थान)

  1. निरमाबेन ठाकोर (हिंदुस्थान) 2ः50ः06
  2. सोनिका परमार(हिंदुस्थान) 2ः50ः55
  3. सोनल (हिंदुस्थान) 2ः55ः45
  4. के. एम. लक्ष्मी (हिंदुस्थान) 2ः58ः49
  5. भागिरथी बिश्त (हिंदुस्थान) 2ः58ः52