सामान्य जनता कधी सुरक्षित होणार? रेल्वे अपघाताप्रकरणी राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बरौनी जंक्शनवर शंटिंग करताना झालेल्या अपघातावर आपली प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदीजी, सामान्य जनता कधी सुरक्षित होणार? असा संतप्त प्रश्न विचारत तुम्ही फक्त ‘एका’ अदाणीला सुरक्षित करण्यात व्यस्त असल्य़ाचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदींवर केला आहे.

बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शन येथे शंटींग ऑपरेशन दरम्यान इंजिन आणि ट्रेनच्या डब्यात अडकल्याने एका 35 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या चटका लावणाऱ्या घटनेचा राहुल गांधी यांनी एक्सवर फोटो शेअर करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदीजी, सामान्य जनता कधी सुरक्षित होणार? असा संतप्त प्रश्न विचारत तुम्ही फक्त ‘एका’ अदानीला सुरक्षित करण्यात व्यस्त आहात. हा भयावह फोटो आणि बातमी हा भारतीय रेल्वेचा निष्काळजीपणा, उपेक्षा आणि जाणिवपूर्वक करण्यात आलेल्या कमी भरतीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

बरौनी जंक्शन येथे पार्सल व्हॅन आणि ट्रेनच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमर कुमार राऊत असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी अमर बरौनी जंक्शन येथे लखनौ-बरौनी एक्स्प्रेसचे इंजिन वेगळे करत असताना ही घटना घडली. शंटिंग ऑपरेशन दरम्यान, ट्रेन चालकाने अचानक इंजिन उलट केले, ज्यामुळे कर्मचारी ट्रेनच्या डब्यात आणि इंजिनमध्ये अडकला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये अमर बरौनी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर उभ्या असलेल्या ट्रेनच्या इंजिन आणि पॉवर कारमध्ये अडकलेला दिसत आहे.