बारामती राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एक भीषण अपघात झाला आहे. रुई लीमटेक मार्गावर गाडीचा टायर फुटून एका 22 वर्षीय तरुणाचता मृत्यू झाला आहे. अपघातात मरण पावलेला तरुण हा काँग्रेस नेत्याच्या मुलागा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे. दरम्यान या अपघातामुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे.
सदर घटना ही मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आदित्य काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत येत होता. दरम्यान प्रवासादरम्यान त्याच्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे महामार्गावर गाडी पलटी झाली. आणि फरफटत एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडी पलटी झाल्यामुळे आदित्य गंभीार जखमी झाला होता. त्याला तत्काळ गाडीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच आदित्यचा मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांना पुत्रशोक झाला आहे.