वेधक – आबूधाबीतील लक्ष्मीनारायण मंदिर, अरेबियन मैत्रीचे प्रतीक

>> भगवान हारूगडे

आबूधाबी येथील जेबेल अली व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले लक्ष्मीनारायणाचे भव्य मंदिर हिंदुस्थान-अरबी शैलीच्या वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिरासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दिली. वास्तुविशारद एक कॅथोलिक ख्रिश्चन तर व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. डिझायनर बौद्ध तर मंदिराचा संचालक जैन होता. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द दिसून येते. हे मंदिर म्हणजे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अखंड मैत्रीचे प्रतीकच होय.

एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये भव्य हिंदू मंदिर असणे प्रत्येक हिंदुस्थानीसाठी अभिमानाची बाब आहे. दुबई आबूधाबी येथील जेबेल अली व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले आणि अध्यात्मिक समृद्धी – स्थापत्य कलेच्या सौंदर्याने नटलेले भव्य लक्ष्मी नारायण मंदिर हे आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील शेख झायेद ग्रँड मस्जिद ही सर्वात मोठी मस्जिद पाहून भारावलेले हिंदुस्थानी पर्यटक स्वामीनारायण मंदिराची भव्यता न्याहाळताच पायरीवर नतमस्तक होतात.

प्रामुख्याने लक्ष्मी आणि नारायण या देवतांचे 27 एकरावर वसलेले आबूधाबीतील हे मंदिर हिंदू स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कुशल कोरीव काम असणारे हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळ नाही तर सांस्कृतिक केंद्र देखील आहे. परिसरात पाऊल टाकताच आल्हाददायक शांत वातावरणाने मन अगदी भरून येते. मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. मंदिराला दोन घुमट, युएईमधील सात अमिरातीचे प्रतीक असलेले सात शिखर आणि 402 खांब आहेत. उन्हाळय़ातील कडक तापमानाला तोंड देण्यासाठी बाहेरील बांधकामासाठी राजस्थानी गुलाबी वाळू आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे. आतील भागात पांढऱया रंगातील इटालियन संगमरवरी कोरीव काम आहे. मंदिरात स्वामीनारायण, राधाकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण, शिव-पार्वती, गणेश- कार्तिकेय, वेंकटेश्वर- पद्मावती, अय्यप्पन स्वामी यांच्या मूर्ती आहेत. हे भव्य मंदिर भारतीय-अरबी शैलीच्या वास्तुकलेचे मिश्रण आहे.

गेल्या काही वर्षांत दुबईला भेट देणाऱया आणि तेथे स्थायिक होणाऱया हिंदुस्थानींची संख्या पाहता एका भव्य मंदिराची आवश्यकता होती. हे मंदिर चार मजल्यांमध्ये उभे आहे; त्यात दोन तळघर, एक तळमजला आणि पहिला मजला आहे. 25,000 पेक्षा जास्त दगडांच्या तुकडय़ांनी बनलेल्या या मंदिराच्या गुंतागुंतीच्या कोरीवकामासाठी दोन हजारपेक्षा जास्त कारागिरांनी काम केले. प्रत्येक शिखरात रामायण, शिवपुराण, भागवत, महाभारतातील कथा आणि जगन्नाथ, स्वामीनारायण, व्यंकटेश्वर आणि अयप्पा यांच्या जीवनाचे चित्रण करणारे कोरीवकाम आहे. तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश या पाच नैसर्गिक घटकही दाखवण्यात आले आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतीवर घोडे, उंट यांसारख्या प्राण्यांचे कोरीव काम आहे. मंदिराच्या सभोवतालचे पाणी हे हिंदुस्थानातील पवित्र नद्यांचे प्रतीक आहे. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर दिसणारे पाण्याचे दोन प्रवाह गंगा आणि यमुना नद्यांचे प्रतीक आहेत.

 मंदिराच्या उभारणीपूर्वी जगन्नाथ, कोणार्क, रणकपूर, देलवाडा आणि भारतातील इतर प्रार्थनास्थळांच्या मंदिरांचा अभ्यास करण्यात आला. हे मंदिर भूकंप प्रतिरोधक बनवण्यात आले. हिंदुस्थान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अखंड मैत्रीचे प्रतीक म्हणून या मंदिराच्या वास्तूकडे पाहिले जाते. या मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, युएईचे मंत्री शेख नाह्यान बिन मुबारक अल नाह्यान आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांनी यावेळी जागतिक सहिष्णुता व एकोपा याचे महत्त्व विषद केले.

 ऑगस्ट 2015 मध्ये युएई सरकारने आबूधाबीमध्ये हिंदू मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय जाहीर केला. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी मंदिरासाठी 13.5 एकर आणि पार्किंगसाठी 13.5 एकर जागा भेट दिली. त्यानंतर 27 एकर जमिनीवर डिसेंबर 2019 मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले.

तसे पाहायला गेले तर दुबईत अनेक छोटी-मोठी हिंदू मंदिरे आहेत. 60 वर्षांपूर्वी दुबईचे पहिले हिंदू मंदिर बुर दुबई प्रदेशात बांधले गेले होते. त्यामुळे युएईमध्ये हिंदूधर्मीयांचे वास्तव्य बऱयाच काळापासून होते हे स्पष्ट होते. या मंदिरात पारंपरिक हिंदू मंदिराचे सर्व पैलू आहेत. मंदिर परिसरात अभ्यागत केंद्र, प्रार्थना हॉल, प्रदर्शने, शिक्षण क्षेत्रे, मुलांसाठी ाढाrडा क्षेत्र, थीमॅटिक गार्डन्स, पाण्याची सुविधा, फूड कोर्ट, भेटवस्तूंचे दुकान यांचा समावेश आहे. भूकंपाच्या हालचाली, तापमानातील फरक आणि दाबातील बदलांचा डेटा देण्यासाठी संपूर्ण मंदिरात 350 हून अधिक सेन्सर आहेत. मंदिरात स्वागत करणारी ‘द वॉल ऑफ हार्मनी’ ही 47 मीटर लांबीची 3डी-प्रिंटेड भिंत आहे. ही भिंत दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाने पूर्ण केली आहे.

या मंदिराच्या बांधकामासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दान केली. या प्रकल्पाचा प्रमुख वास्तुविशारद एक कॅथोलिक ख्रिश्चन होता आणि बांधकाम प्रकल्पाचे व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. पायाभूत डिझायनर बौद्ध आणि मंदिराचा संचालक जैन होते. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द दिसून येते. दुबईत जवळजवळ 40 टक्के भारतीय आहेत. त्यांच्यासाठी हे भव्य लक्ष्मीनारायण मंदिर अध्यात्मिक आकर्षण आहे. भारतीयांसह अनेक देशांतील पर्यटक येथे श्रद्धेने भेट देतात आणि मंदिराची भव्यता, बारकावे, कोरीव काम पाहून भारावून जातात.