कार्ड प्रोटेक्शन रद्द करणाच्या नावाखाली ठगाने बँकर्स महिलेला चुना लावला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला या बँकर्स असून त्या खासगी बँकेत काम करतात. दोन दिवसांपूर्वी त्या काम करत असताना त्यांना एका नंबरवरून फोन आला.
फोन करणाऱ्या महिलेने ती खासगी बँकेतून बोलत असल्याचे भासवले. बँकेचे प्रोटेक्शन कार्ड रद्द करायचे का अशी विचारणा केली. महिलेने होकार दिल्यावर तिला एका वेबसाईटवर जाऊन लॉगिन करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तिने लॉगिन केले.
लॉगिन केल्यावर हेल्प डेस्क नावाचे ऍप डाऊनलोड झाले. ते ऍप डाऊनलोड झाल्यावर त्यावर तक्रारदाराने तपशील टाकला. तेथे बँकेचा कार्ड नंबर टाकण्यास सांगितला. तेव्हा महिलेने कार्डचा नंबर टाकला नाही. काही वेळाने पैशाच्या ट्रान्झेक्शनचे मेसेज आले, मात्र महिलेने तो ओटीपी शेअर केला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने बँकेत फोन केला.
बँकेत फोन करण्यापूर्वी तिच्या खात्यातून एक लाख एक हजार रुपये काढले गेले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.