
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आर्थिक वर्षाअखेरीसच संपाचे शस्त्र उपसले आहे. सार्वजनिक, खासगी, सहकारी, विदेशी तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांचे तब्बल 8 लाखांहून अधिक कर्मचारी 24 आणि 25 मार्चला संपावर जाणार आहेत. त्याआधी शनिवारी, रविवारची सुट्टी असल्यामुळे बँकिंग व्यवहार सलग चार दिवस ठप्प राहणार आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.
संपूर्ण देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 9 संघटना आहेत. या सर्व संघटना ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या छत्राखाली देशभर संप पुकारणार आहेत. युनियनने बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत इंडियन बँक असोसिएशनसोबत बोलणी फिस्कटली. त्यामुळे युनियनने संपाचा पवित्रा घेतला आहे. संपाचा सार्वजनिक, खासगी, प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. रोख रकमेचा व्यवहार, कर्ज हप्त्यांची कपात, अॅडव्हान्स आदी सेवा कोलमडण्याची शक्यता असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होणार होणार आहे. दोन दिवसीय संपाआधी शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने बँक ग्राहक, गुंतवणूकदार आपल्या शिल्लक कामांची ‘31 मार्च’ची डेडलाईन पाळण्यासाठी धावाधाव करीत आहेत. याचदरम्यान सलग चार दिवस बँकिंग कामकाज ठप्प राहणार आहे.
या मागण्यांसाठी संप
बँकांमध्ये सर्व प्रवर्गांत पुरेशा पदांवर नोकरभरती करावी, सर्वच हंगामी कामगारांना सेवेत कायमस्वरूपी करावे, बँकांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करणे, बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेणे, बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे, ग्रॅच्युईटी कायद्यात दुरुस्ती करून 25 लाखांपर्यंत मर्यादा (सिलिंग) वाढवणे अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप केला जाणार आहे.
संपाच्या कालावधीत एटीएम आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहार सुरू राहणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आज संपावर
सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पुरेशी नोकरभरती करावी, कर्मचाऱ्यांशी निगडित प्रश्नांवर द्विपक्षीय वाटाघाटीतून तोडगा काढावा आदी मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुंबईतील विभागीय कामगार आयुक्तांसोबत बुधवारी चर्चा झाली. त्यावेळीही व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले. गुरुवार, 20 मार्चला देशभरात निदर्शने, मेळावे, धरणे, मोर्चे काढण्यात येऊन मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल. तसेच 24 व 25 मार्चच्या संपातही आमचे कर्मचारी सहभागी असतील, अशी माहिती फेडरेशनचे सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली.