गर्दी, भांडणतंटे, आमदारांकडून मारहाण; लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचारी हैराण

मिंधे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून बँक कर्मचारी मात्र हैराण झाले आहेत. खाती उघडणे, आधार लिंकिंग, योजनेचे पैसे घेणे यासाठी बँकांमध्ये लाभार्थी महिलांची अलोट गर्दी होत आहे. त्यामुळे कर्मचायांकडून थोडाही विलंब झाला तर भांडणतंटे होत आहेत आणि ते वाद स्थानिक आमदारांपर्यंत पोहोचले की आमदार मंडळी बँकांमध्ये येऊन अधिकाऱयांना धमकावत, मारहाण करत आहेत. यामुळे त्रस्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱयांनी संरक्षणाची मागणी केली असून त्यासाठी 16 नोव्हेंबरला लाक्षणिक संपाची हाक दिली आहे.

लाडकी बहीण योजना लागू करण्यापूर्वी मिंधे सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन केले नाही किंवा बँकांशी समन्वयही साधला नाही. योजनेतून मिळणाऱया पैशांवर बँकांनी सेवाशुल्क आकारला आहे. तो खात्यातून वळता करून घेतल्यानंतर पैसे कमी कसे झाले यावरून लाभार्थी महिलांची बँकेतील काऊंटरवर भांडणे होत आहेत. त्यावरून गावोगावचे आमदार समाजपंटकांना घेऊन बँकांमध्ये येऊन संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱयांना मारहाण करत असल्याच्याही घटना घडल्या आहेत.

मारहाणीच्या घटनांबाबत बँकांकडून पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आले परंतु बहुतांश ठिकाणी आरोपींना जामिनावर सोडून देण्यात आले. त्यानंतरही ते बँकांमध्ये येऊन कर्मचाऱयांना धमकावत आहेत. यामुळे बँक कर्मचाऱयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या घटनांच्या निषेधार्थ आणि संरक्षणाच्या मागणीसाठी युनायटेड पह्रम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचारी 16 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा राज्यव्यापी संप करणार आहेत, असे पह्रमचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले. तत्पूर्वी आझाद मैदानात धरणे आंदोलन, सामुहिक रजा, पॅन्डल मार्च अशी आंदोलने करण्याचा इशाराही पह्रमने दिला आहे.

इथे घडल्या मारहाणीच्या घटना
13 ऑगस्ट – जालना वरुड बुद्रुक येथील महाराष्ट्र बँक
31 ऑगस्ट – पुणे इंदापूर लोणी देवकर येथील बँक ऑफ बडोदा
21 सप्टेंबर – पुण्यातील वाकड येथील पंजाब नॅशनल बँक
27 सप्टेंबर – जालना बदनापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र
1 ऑक्टोबर – धर्मापुरी बीड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक
4 ऑक्टोबर – युको बँक र्दौंड-पुणे शाखा
6 ऑक्टोबर – पुणे फुरसुंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र
10 ऑक्टोबर – धुळे वरवडी येथील बँक ऑफ बडोदा, लातूर येथील सेंट्रल बँक आणि जालना गेवराई बाजारातील महाराष्ट्र बँक
16 ऑक्टोबर – मालेगाव दाभाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र