दोन कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक

अंधेरी येथील एका खासगी बँकेच्या 2 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मिश्रा असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी येथे एक खासगी बँक आहे. त्या बँकेत तक्रारदार हे वरिष्ठ पदावर काम करतात. त्यांच्या बँकेतील काही कर्मचारी हे पदाचा गैरवापर करून कोटय़वधी रुपयांचा अपहार करत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यानंतर त्याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती सांगितली. बँकेने चौकशीचे आदेश दिले. चौकशीदरम्यान सहा कर्मचाऱयांना बँकेने काही विशेष अधिकार दिले होते. त्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला.

बँकेचे दोन कोटी 5 लाख रुपये हे नातेवाईकाच्या बँक खात्यात वर्ग केले होते. हा घोटाळा उघड होऊ नये याची खबरदारी घेतली होती. अपहाराचा प्रकार लक्षात येताच बँकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. सागर हा अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून सागरला अटक केली. पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.