मिनिमम बॅलन्सचा ग्राहकांना भुर्दंड, बँकांनी 8500 कोटी रुपये उकळले

बँक खातेदारांना आपल्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. मिनिमम बॅलन्स नसल्यास खातेदारांना बँका दंड ठोठावतात. या दंडातून बँकांना तगडी कमाई होत आहे. सरकारी बँकांनी पाच वर्षांत मिनिमम बॅलन्सच्या दंडापोटी ग्राहकांकडून तब्बल 8500 कोटी रुपयांची वसुली केल्याची बाब उघड झाली आहे.

मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली करण्यात आलेल्या वसुलीची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. पंकज चौधरी यांच्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांत सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्स दंडाच्या रुपात ग्राहकांकडून 8494 कोटी रुपये वसूल केले आहेत. सरकारी क्षेत्रातील 12 बँकांनी मागील आर्थिक वर्षात मिनिमम बँक बॅलन्स नसल्यामुळे 2331 कोटी रुपयांचा दंड खातेदारांना लावला. 2023-24 या आर्थिक वर्षातील दंडाची वसुली सर्वात जास्त आहे. सरकारी बँकांनी पहिल्यांदा दोन हजार कोटींचा वसुलीचा आकडा पार केला.

पाच वर्षांची आकडेवारी

 सरकारी बँकांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मिनिमम बॅलन्स दंडामधून 1855 कोटी रुपये कमवले. 2021-22 या आर्थिक वर्षांत हा आकडा 1429 कोटी रुपये होता. 2020-21 मध्ये 1142 कोटी रुपये तर 2019-20 मध्ये 1738 कोटी रुपये होता. अशा तऱहेने ग्राहकांकडून दंड म्हणून सुमारे 8500 कोटी रुपये सरकारी बँकांनी कमवले आहेत.
 एसबीआयने 2019-20 या आर्थिक वर्षात या दंडापोटी 633 कोटी रुपये वसूल केले आहेत.
 दंडातून सर्वाधिक कमाई पंजाब नॅशनल बँक करत आहे. इंडियन बँकेने 369 कोटी तर पॅनरा बँकेने 284 कोटी कमवले.

70 टक्के करदात्यांची न्यू टॅक्स रिजीमला पसंती, 6 कोटींहून अधिक आयटीआर फाईल

आर्थिक वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी देशभरातील 70 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी न्यू टॅक्स रिजीमला पसंती दर्शवली आहे. 31 जुलै आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख होती. डेडलाईन संपल्यानंतर टॅक्सपेयर्स दंड भरून 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न फाईल करू शकतील. 6 कोटी 9 लाखांहून अधिक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यात आल्या आहेत.

इन्स्टावर ‘एआय अवतार’ अॅटोमॅटिक रिप्लाय देणार

समजा तुम्ही आंघोळ करताय किंवा झोपलेला आहात आणि तरीही तुमच्यावतीने इन्स्टाग्रामवरून मेसेज पाठवले जाताहेत… काय खरं वाटत नाही ना…पण लवकरच हे सत्यात उतरणार आहे. कारण मेटाने त्यासाठी एक खास फीचर सुरू केलेय. म्हणजे तुम्ही इन्स्टाग्रामवर नसतानाही तुमच्यावतीने मेसेज पाठवले जातील. ‘मेटा एआय स्टुडियो’ असे या फीचरचे नाव आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी ‘मेटा’ ने आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित टुल्स जारी केलेय. ‘मेटा एआय स्टुडियो’ या नव्या टुल्समुळे युजर्स स्वतःचे एआय चॅटबॉट बनवू शकतात, डिझाईन करू शकतात व शेअर करू शकतात. याशिवाय एआय स्टुडियोचा वापर करून ‘एआय अवतार’ बनवू शकतील.

– इन्स्टाग्रामवर ‘मेटा एआय स्टुडियो’चा वापर करून स्वतःचे ‘एआय अवतार’ बनवता येईल. तुमच्या वतीने तुमचा ‘एआय अवतार’ तुम्हाला इन्स्टाग्रामवर आलेल्या स्टोरीला किंवा मेसेजला रिप्लाय देईल.

– सध्या ‘मेटा एआय स्टुडियो’ फीचर अमेरिकेत लाँच झालंय. हे फीचर हिंदुस्थानात कधी सुरू होणार, याची अधिपृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.