धोतरामुळे वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून रोखले

धोतर नेसल्यामुळे एका वृध्द शेतकऱयाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे. बेंगळुरूमधील जीटी मॉलमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हा शेतकरी आपल्या मुलांसोबत मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. परंतु त्यांच्या कपडय़ांमुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाऊच दिले नाही. सुरक्षा रक्षकांनी शेतकऱयाला सांगितले की, व्यवस्थापन कोणालाही धोतर घालून आत येऊ देत नाही आणि जर त्याला मॉलमध्ये जायचे असेल तर त्याने पँट परिधान करणे आवश्यक आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शेतकरी आणि त्यांच्या मुलाची माफी मागितली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत मॉल व्यवस्थापनाचा निषेध केला असून ते वृद्ध शेतकऱयाचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी संघटनेने मॉलबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याआधीही एका शेतकऱयाला त्याच्या घाणेरडय़ा कपडय़ांमुळे बेंगळुरूच्या राजाजीनगर स्टेशनवर एका अधिकाऱयाने मेट्रो ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखले होते.