
>> आशिष बनसोडे
राज्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. दररोज कुठे ना कुठे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीना पकडले जात आहे. पण या कारवाया कुचकामी असून मुळावर घाव घालण्याची आवश्यकता आहे. सीमारेषा उघड्या असल्याने तेथून राजरोस घुसखोरी होतेय. तिथे रोखले जात नाही आणि इथे कारवाया केल्या जाताहेत, तिथेच बंदोबस्त व्हायला हवा, असे खुद्द बांगलादेशी नागरिक सांगतात.
मोठय़ा संख्येने बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानात घुसखोरी करत आहेत. देशातील विविध शहरांत, गावांत त्यांनी बस्तान मांडले आहे. गंभीर म्हणजे या सर्वांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका बनवून दिली जातात. हे सर्व अगदी सहज शक्य होते. या कागदपत्रांच्या आधारे घरदेखील घेतले जाते. एजंट लोकांच्या माध्यमातून हे सर्व कुठल्याही अडथळय़ाविना बिनधास्त सुरू आहे. पोलीस आता घुसखोर बांगलादेशींविरोधात कारवाया करत आहेत, पण ते फारसे फायद्याचे नाही. कारण इथे कारवाई होतेय, पण जिथे व्हायला हवी तिथे काहीच होत नसल्याचे बांगलादेशी नागरिक सांगतात.
तिथे पाठवले जाते, ते परत येतात
घुसखोरांना पकडून त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवले जाते, पण ते नागरिक काही दिवस तेथे राहून पुन्हा हिंदूस्थानात येतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे चक्र सुरू आहे. बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी खरंच थांबवायची असेल तर सीमारेषा सीलबंद करायला हव्या, असे बांगलादेशी नागरिक सुलेमान (नाव बदललेले) आणि त्याचे अन्य सहकारी सांगतात.
25 हजारांत तिकडून इकडे
बांगलादेशी एजंट सीमारेषा ओलांडून देतो. यासाठी तो एजन्ट एकाकडून 25 हजार घेतो. हिंदुस्थानात आल्यानंतर इथला एजन्ट त्याचे कमिशन घेतो. तसेच घुसखोरी करण्याआधी संबंधित बांगलादेशी नागरिक ज्या शहरात जायचे आहे तेथील एजंटशी आधीच संगनमत करून ठेवतात, असेही तो म्हणाला.
येथून होते घुसखोरी
बेनापोल, सातखिरा, हकिमपूर, राशाय, सुंदरबन, भुमरा, टाकी, फतकली या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात घुसखोरी केली जाते. याठिकाणी पायबंद घातला तर हिंदुस्थानात घुसखोरी होणार नाही.
बेनापोल ते बोनगा घुसखोरांचा डंकी मार्ग
हिंदुस्थान-बांगलादेशदरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेला लागूनच बांगलादेशात बेनापोल गाव आहे. हिंदुस्थानात येऊ इच्छिणारे बांगलादेशी बेनापोल गावात एकवटतात. रात्री 10 वाजल्यानंतर तेथून बांगलादेशी एजंट एका गटाने बांगलादेशी नागरिकांना सीमारेषा पार करून देतात. मग बोनगा गावात हिंदुस्थानी एजंट त्या सर्वांना एकत्र करून हावडा ब्रिजखाली नेतो. तेथे ज्याला ज्या शहरात जायचेय ते ठरवून मग रेल्वेच्या जनरल डब्याची तिकिटे काढून दिली जाते. अशा प्रकारे अगदी सहज घुसखोरी केली जाते.