बंगाल आणि आसाममधील कट्टरपंथींना दिलं दहशतवादाचं प्रशिक्षण; बांगलादेशी दहशतवाद्याला 7 वर्षांची शिक्षा

बंगाल आणि आसाममधील कट्टरपंथींना दहशतवादाचं प्रशिक्षण देणाऱ्या बांगलादेशी दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जाहिदूल इस्लाम असे या बांगलादेशी दहशतवाद्याचे नाव असून तो जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश इंडियाच्या (जेएमबी-इंडिया) इशाऱ्यावर हिंदुस्थानमध्ये दहशतवाद पसरवण्याचे आणि कट्टरपंथींना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिदूल इस्लाम उर्फ कौसर याला दरोडा, षडयंत्र रचणे आणि फंड गोळा करण्यासह दारुगोळा खरेदी प्रकरणात 57 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याच प्रकरणात अन्य 11 आरोपींनाही दोषी ठरवण्यात आले आहे. जाहिदूल इस्लाम आणि त्याचे सहकारी ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या बर्दवान बॉम्बस्फोटात सहभागी होते, असेही ‘एनआयए’ने सोमवारी एक निवेदन जारी करत म्हटले.

जाहिदूल इस्लाम याने 2014 मध्ये बेकायदेशीररित्या हिंदुस्थानमध्ये प्रवेश केला होता. ऑक्टोबर 2014 मध्ये पश्चिम बंगालमधील बर्दवान येथे झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता, तर एक जण जखमी झाला होता.

या स्फोटानंतर जाहिदूल सहकाऱ्यांसह बंगळुरुला पळून आला आणि जिथे त्याने जेएमबीचे नेटवर्क बनवण्यासाठी पश्चिम बंगाल आणि आसामधून आलेल्या भोळ्याभाबड्या मुसलमान कट्टरपंथी तरुणांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये जाहिदूल याने बोधगया येथेही स्फोट घडवून आणला होता. जाहिदूल याच्यावर बंगळुरू शहर पोलिसात जून 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जेमबीच्या दहशतवादी अजेंडाला प्रोत्साहन देण्यासाठी जाहिदूल याने दरोड्याचेही षडयंत्र रचले होते. 2018 मध्ये जाहिदूल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बंगळुरूमध्ये 4 ठिकाणी दरोडा टाकला होता. या पैशाचा वापर त्याने कट्टरपंथी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी केला होता. याप्रकरणी जाहिदूल याला अटक करून 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.