मायदेशात प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा विषय नेहमीच लय हार्ड असतो. त्यामुळे पाकिस्तानला कसोटी मालिकेत लोळवून नवा इतिहास घडविणाऱ्या बांगलादेश संघाची आता हिंदुस्थान दौऱ्यावर खरी ‘कसोटी’ लागणार आहे. हिंदुस्थान आणि बांगलदेश यांच्यात चेन्नईच्या चेपॉक येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर उद्यापासून पहिला कसोटी सामना रंगणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेली रोहित शर्माची सेना आपल्या अव्वल स्थानाला आणखी बळकटी देण्यासाठी बांगलादेशला चारीमुंड्या चीत करण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, एवढं नक्की.
हिंदुस्थानकडे कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, के. एल. राहुल, यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, ऋषभ पंत अशी स्टार फलंदाजांची आघाडीची फळी आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव या अष्टपैलू खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या फलंदाजीची खोली सहज लक्षात येते. गोलंदाजीमध्ये हिंदुस्थानकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा असा अनुभवी अन् वैविध्यपूर्ण ताफा आहे. मात्र चेपॉकच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर आकाश दीप किंवा यश दयाल यांच्यापैकी एकाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपाने किंवा पुलदीप यादव व अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला तिसरा फिरकीपटू म्हणून संघात घेतले जाते की नाही हे बघावे लागेल.
हम भी है जोश मे!
पाकिस्तानला कसोटी मालिकेत त्यांच्या देशात 2-0 फरकाने पराभूत केल्याने मोठ्या आत्मविश्वासाने बांगलादेशचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला आहे. हिंदुस्थानप्रमाणेच खोलवर फलंदाजी ही बांगलादेश संघाची ताकद होय. शिवाय नाहिद राणा व हसन महमूद ही नव्या दमाची तुफानी वेगवान गोलंदाजांची जोडगोळी हिंदुस्थानी फलंदाजांना रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतील. शिवाय शाकिब अल हसन, तैजुल इस्लाम व मेहदी हसन मिराज अशी फिरकीचे अनुभवी त्रिपूट खरी बांगलादेशची ताकद असणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानसारख्या अव्वल संघाविरुद्ध गमावण्यासारखे काहीच नसलेला बांगलादेश संघ नव्या जोशात खेळताना दिसणार आहे.
फिरकीविरुद्ध सावधान
हिंदुस्थानी फलंदाज मागील तीन वर्षांपासून फिरकी गोलंदाजीविरूद्ध अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीदेखील फिरकी गोलंदाजीपुढे चाचपडताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा फिरकी गोलंदाजीवर हवाई हल्ले चढविण्यात माहीर आहे. त्याने फिरकीविरुद्ध 90 हून अधिक सरासरीने धावा फटकाविलेल्या आहेत, मात्र 2021 पासून फिरकीविरुद्ध त्याचीही कामगिरी खालावली आहे. मागील 15 कसोटी सामन्यांत त्याला केवळ 44 च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. याउलट ऋषभ पंत (पाच सामन्यांत 70 ची सरासरी), शुबमन गिल (10 सामन्यांत 56 ची सरासरी) व यशस्वी जैसवाल (5 सामन्यांत 115 ची सरासरी) यांनी चांगल्या धावा केल्या आहेत, मात्र जैसवाल व गिल यांनी इंग्लंडच्या अननुभवी फिरकी गोलंदाजांची धुलाई केली होती. त्यामुळे दर्जेदार फिरकीविरुद्ध अजून त्यांची परीक्षा होणे बाकी आहे. ऋषभ पंत तब्बल दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा असतील.
उभय संघ
हिंदुस्थान : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह व यश दयाल.
बांगलादेश : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिपुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सैयद खालिद अहमद, जाकिर अली अनिक.