बांगलादेशात विद्यार्थ्यांचा असंतोष आला उफाळून; आंदोलकांनी सरकारी टीव्हीचं मुख्यालय पेटवलं, आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू

बांगलादेशी विद्यार्थ्यांनी गुरुवारी देशाच्या सरकारी टीव्ही चॅनेलचं मुख्यालय पेटवून दिलं. एक दिवस अगोदरच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चिघळत चाललेलं आंदोलन शांत करण्यासाठी या चॅनेलवरून आवाहन केलं होतं. मात्र संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत याचा विरोध केला आणि थेट मुख्यालयावर हल्ला करून ते पेटवून दिलं. आतापर्यंत या संघर्षात 32 लोक मारले गेले आहेत.

नागरी सेवा नियुक्तीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली आहे. हे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावर रबर बुलेटने गोळीबार करणाऱ्या दंगल विरोधी पोलिसांना या जमावानं घेरल्याचं वृत्त आहे.

संतप्त जमावाने माघारी फिरणाऱ्या अधिकाऱ्यांचा राजधानी ढाका येथील बीटीव्हीच्या मुख्यालयापर्यंत पाठलाग केला, त्यानंतर नेटवर्कची रिसेप्शन इमारत आणि बाहेर उभी असलेली डझनभर वाहने पेटवून दिली.

आग वेगानं पसरल्याने ‘अनेक लोक’ आत अडकले होते, सरकार प्रसारकानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तशी माहिती दिली आहे. मात्र स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने नंतर एएफपीला अधिकृत माहिती दिली की इमारतीमधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आहे.

आग अजूनही पेटलेलीच आहे, असं देखील अधिकाऱ्यानं सांगितलं. ‘आम्ही बाहेर मुख्य गेटवर आलो आहोत. आमचे प्रक्षेपण आत्तासाठी बंद करण्यात आले आहे’, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

देशातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहे. हसीना सरकारने शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारी रात्री शेख हसीना यांनी या चॅनेलवरून आंदोलकांच्या ‘हत्येचा’ निषेध केला आणि त्यांच्या कशाचीही पर्वा न करता दोषींना शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं.

परंतु त्यांच्या शांततेच्या आवाहनानंतर देखील रस्त्यावर हिंसाचार वाढला कारण पोलिसांनी पुन्हा रबर बुलेट आणि अश्रुधुराच्या गोळ्यांनी निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न केला.

‘पंतप्रधानांनी आमची माफी मागावी ही आमची पहिली मागणी आहे’, असं आंदोलक बिदिशा रिमझिम (वय 18) हिने एएफपीला सांगितलं. ‘दुसरं, आमच्या मारल्या गेलेल्या बांधवांना न्याय मिळायला हवा’, ती पुढे म्हणाली.

एएफपीने संकलित केलेल्या रुग्णालयांमधील आकडेवारीनुसार आठवड्याच्या सुरुवातीला सात ठार व्यतिरिक्त गुरुवारी किमान 25 लोक ठार झाले, आणि शेकडो जखमी झाले.

हॉस्पिटलच्या आकड्यांद्वारे एएफपीला दिलेल्या माहिती नुसार,मृतांपैकी दोन तृतीयांश लोकांच्या मृत्यूचे कारण पोलिसांनी वापरीलेली शस्त्रे होती.