बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ बंगाली समाज एकता संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील बंगाली समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या पंतप्रधानांना निवेदन पाठविले. निवेदनातून त्यांनी बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार तातडीने थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील हिंदू बांधवांवर सातत्याने हल्ले होत असून या अत्याचारामुळे हिंदू बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुस्थान हा बहुसंख्य हिंदू बांधवांचा देश आहे. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने हस्तक्षेप करून होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबवाव्या, अशी बांगलादेशातील हिंदू बांधवांकडून आर्त हाक दिली जात आहे.
चंद्रपूर शहरात बंगाली समाजबांधव मोठ्या संख्येने राहतात. या समाजबांधवांच्या वतीने बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. मनोज पाल यांच्या नेतृत्वात माँ दुर्गा काली माता मंदिर पासून शहरातील मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात हजारो बंगाली बांधव उपस्थित झाले होते.