बांगलादेशातील हिंदू दुर्गापूजेच्या तयारीला लागले असतानाच अजान आणि नमाजाच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि लाऊडस्पीकर यंत्रणा बंद कराव्यात, अशा सूचना तिथल्या मोहमद युनूस सरकारने दिल्या आहेत. मंगळवारी हे फर्मान निघाले असले तरी तिथल्या हिंदूंवरील या अन्यायाविरुद्ध मोदी सरकारने बांगलादेशला चकार शब्दानेही सुनावलेले नाही.
शेख हसिना परागंदा झाल्यावर सत्तासूत्रे हाती घेणाऱया मोहमद युनूस यांनी येथील अल्पसंख्याक हिंदूंच्या हक्क संरक्षणाविषयी तोंडपाटीलकी चालवली असली तरी प्रत्यक्षात हिंदू आणि हिंदुस्थानविरोधी निर्णय, धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता ऐन दुर्गापूजा उत्सवात पूजा समित्यांना अजान आणि नमाजच्या पाच मिनिटे आधी आणि दरम्यान वाद्ये आणि ध्वनी यंत्रणा बंद ठेवण्याच्या सूचनावजा आदेशच जारी करण्यात आले आहेत. बांगलादेशच्या गृह व्यवहार सल्लागारांनी दुर्गापूजेपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दय़ांवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
हिंदू समाजात संताप या आदेशामुळे हिंदू समाजात संताप व्यक्त होत आहे. गृह मंत्रालयाचे सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी सचिवालयात बांगलादेश पूजा उद्योग परिषदेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाला विरोधही होत आहे.
तालिबानी फर्मानाशी तुलना
बांगलादेश सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. जहांगीर आलम चौधरी यांचा व्हिडीओ शेअर करताना इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी या आदेशाची तुलना तालिबानी फर्मानाशी केली. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाच्या सल्लागारांना भेटा, जे हिंदूंनी अजानच्या पाच मिनिटे आधी त्यांची पूजा, संगीत आणि इतर गोष्टी थांबवायला हव्यात अन्यथा अटकेला सामोरे जावे लागेल, असे सांगत आहेत. हा नवा तालिबानी बांगलादेश आहे. पण बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदू असल्यामुळे कोणीही बॉलीवूडीया त्यांच्यासाठी फलक लावणार नाही, असे दास यांनी म्हटले आहे.