
एकीकडे हिंदुस्थानात वक्फ सुधारणा विधेयक मांडले जात असताना आता शेजारील बांगलादेशात इस्लामी सरकार आणि शरिया कायद्यासाठी कट्टरपंथी मुस्लिम नागरिक तसेच संघटनांनी आग्रह धरल्याचे चित्र आहे. याप्रकरणी ढाका येथे मुस्लिम संघटनांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावरून अल्पसंख्याक आणि महिला कट्टरपंथींच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले असून याबाबत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘ढाका ट्रिब्युनल’ने वृत्त दिले आहे.
तरुण महिला आता फुटबॉल खेळू शकणार नाहीत, अशी घोषणा कट्टरपंथीयांनी केली. बांगलादेश लोकशाहीची पुनर्स्थापना आणि 17.5 कोटी लोकांसाठी नवे भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना कट्टरपंथी इस्लामी नेते बांगलादेशात एक इस्लामी सरकार स्थापन करणे आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी एकत्र येत असल्याचे चित्र आहे.
कट्टरंथीपय रस्त्यावर उतरल्याबद्दल सर्वाधिक नाराजी बांगलादेशातील विद्यार्थिनींनी व्यक्त केली. एकपक्षीय सरकारच्या जागी लोकशाहीवादी मोकळेपणाची व्यवस्था येईल अशी आशा होती, परंतु आता आपली फसवणूक झाल्याची भावना अनेक विद्यार्थिनींनी व्यक्त केली. ढाका विद्यापीठातील 29 वर्षीय विद्यार्थिनी शेख तस्नीम अफरोज एमी म्हणाली की, शेख हसीना यांची हकालपट्टी करताना आम्ही आंदोलनात सर्वात पुढे होतो, परंतु आता चित्र पूर्णपणे बदलले आहे.
…तर आम्ही मृत्युदंड देऊ
सरकार इस्लामचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देणार नसेल तर ही शिक्षा आम्ही संबंधित व्यक्तीला देऊ, असा इशारा ढाका येथील एका सभेत कट्टरपंथी आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, नव्या घटनेचा मसुदा तयार करणाऱया विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी संबंधित दस्तावेजात धर्मनिरपेक्षता संपवण्यात येईल ही बाब मान्य केली.