हिंदुस्थानच्या युवा संघाचे नवव्यांदा ‘आशियाचा राजा’ होण्याचे स्वप्न बांगलादेशने उद्ध्वस्त केले. बांगलादेशने बलाढ्य हिंदुस्थानचा 59 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपद राखण्याचा पराक्रम केला. आजच्या जेतेपदाच्या लढतीत इक्बाल हुसैन इमोन ‘सामनावीर’ ठरला. ‘मालिकावीरा’ची माळही त्याच्याच गळ्यात पडली. गतवर्षी बांगलादेशने उपांत्य फेरीतच हिंदुस्थानला हरवले होते, तर फायनलमध्ये ‘यूएई’चा पराभव करून आपले पहिलेवहिले जेतेपद संपादले होते.
गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले
हिंदुस्थानने बांगलादेशला 198 धावसंख्येवर रोखून खरं तर अर्धी लढाई आधीच जिंकली होती, मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी जे कमावले, त्यावर फलंदाजांनी पाणी ओतले. आयुष म्हात्रे (1) व वैभव सूर्यवंशी (9) ही हिंदुस्थानची स्टार सलामीची जोडी नेमकी फायनलमध्येच फ्लॉप ठरली. त्यानंतर सी. आंद्रे सिद्धार्थ (20), के. पी. कार्तिकेय (21) व कर्णधार मोहम्मद अमान (26) यांनीच काय तो बांगलादेशी फलंदाजांचा काही वेळ प्रतिकार केला. त्यानंतर तळाला हार्दिक राज (24) लढला. इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्याने हिंदुस्थानचा डाव 35.2 षटकांत 139 धावसंख्येवरच संपुष्टात आला. बांगलादेशकडून इक्बाल हुसैन इमोन व अझीझुल हकिम यांनी 3-3 फलंदाज बाद केले. अल फहादला 2, तर मारूफ म्रिधा व रिझान हुसैन यांना 1-1 विकेट मिळाली.
हिंदुस्थानची अचूक गोलंदाजी
नाणेफेकीचा काल जिंकून हिंदुस्थानने बांगलादेशला फलंदाजीचे निमंत्रण दिले. बांगलादेशला 49.1 षटकांत 198 धावसंख्येवर रोखून हिंदुस्थानी गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. बांगलादेशकडून मोहम्मद सिहाब जेम्स (40), रिझान होसान (47) व फरिद हसन (39) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. सलामीवीर झवार अबरार (20) व कर्णधार अझीझूल हकीम (16) यांना मोठी खेळी करता आली नाही. तळाला मारूफ म्रिधा 11 धावांवर नाबाद राहिला. हिंदुस्थानकडून युद्धजित गुहा, चेतन शर्मा, हार्दिक राज यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या, तर किरण चोरमले, के. पी. कार्तिकेय व आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.