बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला असून अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. हिंदूंच्या घरांवर, मंदिरांना लक्ष्य करून त्यांची नासधूस केली जात आहे. अशातच बांगलादेशमध्ये इस्कॉनचे काम करणारे चिन्मय कृष्णदास यांना अटक करण्यात आल्याने वातावरण आणखी चिघळले आहे. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला हिंदुस्थानी वाहिन्यांच्या माध्यामातून वाचा फोडली जात आहे. मात्र, त्याच्यावर सुद्धा आता बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असून तशी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदुस्थानी वाहिन्यांच्या माध्यामातून बांगलादेशच्या संस्कृती आणि समाजावर वाईट परिणाम होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
सोमवारी (02-12-2024) वकील एकलास उद्दीन भुईया यांनी केबल टेलिव्हिज नेटवर्क ऑपरेशन कायदा 2006 अंतर्गत हिंदुस्थानी वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याच बरोबर बांगलादेशमध्ये हिंदुस्थानी वाहिन्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध लावण्याचा नियम का जारी करू नये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या याचिकेवर फातिमा नजीब आणि न्यायमूर्ती सिकंदर महमुदूर रजी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच याचिकेमध्ये प्रतिवादी म्हणून बांगलादेश दूरसंचार नियामक आयोग (BTRC), अन्य प्रतिवादी आणि मंत्रायल आणि गृह मंत्रालय सचिवांचा समावेश आहे.
ढाका ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानातील काही वाहिन्यांची नावं प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या वाहिन्यांच्या माध्यामातून बांगलादेशच्या संस्कृतीच्या विरोधात प्रक्षोभक माहिती प्रसारित केली जात आहे. त्यामुळे युवकांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रतिबंध करण्यात येणाऱ्या वाहिन्यांच्या नावांमध्ये स्टार जलसा, स्टार प्लस, झी बांगला यांसह इतर काही वाहिन्यांच्या नावांचा समावेश आहे.