Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक मोठी दुर्घना घडली आहे. येथे विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्य़ा बसला आग लागली. या अपघातात 25 विद्यार्थ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी लगेचच बचावकार्य सुरू केले.

दरम्यान, या बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी होते. ही बस शाळेतील मुलांना आणि त्यांच्या शिक्षकांना घेऊन जात असताना हा अपघात झाला, अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली. सर्वजण शाळेच्या सहलीला जात होते. त्यानंतर राजधानीच्या उत्तरेकडील उपनगर पाथुम थानी प्रांतात बसचा टायर फुटला. यानंतर बसला आग लागली.

आग एवढी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. त्यामुळे तब्बल 25 मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यादरम्यान काही विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाल्याचे दिसत आहे.  मुलांचे वय आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही.