रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसला. वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास अक्षरशः रक्ताचा सडा पडला. अनारक्षित वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस फलाटावर पोहोचताच दिवाळी आणि छटपूजेनिमित्त उत्तर प्रदेशात गावी जाणारे हजारो प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये शिरण्यासाठी एक्स्प्रेसवर तुटून पडले आणि चेंगराचेंगरी झाली. महिला, मुले, वृद्ध कुणाचीही परवा न करता प्रत्येक जण रेल्वे गाडीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून खेचाखेची, धक्काबुक्की झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन भीषण स्थिती निर्माण झाली. पिंकाळय़ा, रक्ताचा सडा, चपलांचा खच असे भयाण दृश्य वांद्रे टर्मिनसवर होते. या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या कारभारावर विरोधकांकडून तसेच सोशल मीडियातून टीकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आज पहाटे सवा पाचच्या सुमारास वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर येथे जाण्यासाठी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असते. त्यामुळे ही ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे फलाटावर हजारोंच्या संख्येने प्रवाशांची गर्दी उसळली होती. दिवाळी असल्याकारणाने आणि त्यात छटपूजा हा उत्तर भारतीयांचा मोठा सण असल्यामुळे गावी जाण्यासाठी रेल्वे फलाटावर प्रचंड गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे या गर्दीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे कुणीही रेल्वे स्थानकात कुटुंबकबिल्यासह शिरत होता आणि कुठेही थांबत होता. त्यामुळे रेल्वे फलाटावर अक्षरशः मुंगी शिरायलाही जागा नव्हती असे चित्र होते.
विशेष ट्रेन 16 तास उशिरा आल्याने गर्दी वाढली
रेल्वेकडून दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे सोडण्यात येतात, परंतु कालच्या एका स्पेशल ट्रेनला तब्बल 16 तास उशीर झाल्याने ती ट्रेन रद्द करण्यात आली. त्या ट्रेनची गर्दी अंत्योदय एक्स्प्रेसला आली. त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे. या ठिकाणी पोलीस हजर होते. रांगा लावण्याचेही काम सुरू होते, परंतु जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली, अनेकांनी यावेळी हुल्लडबाजी केली, असे पोलिसांनी म्हटले आहे.
नेमके काय घडले?
उत्तर भारतात जाण्यासाठी पश्चिम एक्स्प्रेसने विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. दर रविवारी वांद्रय़ातून गोरखपूरला जाण्यासाठी अंत्योदय ही 22 डब्यांची गाडी सोडली जाते. या गाडीत तत्काळ तिकीट काढून प्रवास करण्याची मुभा असते. शनिवारी रात्री गोरखपूर ते वांद्रे ही विशेष एक्स्प्रेस येण्यास 16 तास उशीर झाला. रेल्वेचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे कोलमडले. गोरखपूर-वांद्रे ही विशेष गाडी उशिराने आल्याने टर्मिनसमध्ये आधीच प्रचंड गर्दी उसळलेली होती. अनेकांचे नातेवाईकही प्लॅटफॉर्म तिकीट काढून आले होते. 16 डबे फलाटावर येताच गाडीचा वेग कमी झाला. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली. दरवाजाजवळ प्रवाशांनी एकच गर्दी केली. यात प्रवाशांचा तोल जाऊन अनेक प्रवासी त्यांच्या अंगावर पडले. याचदरम्यान काही प्रवाशांनी हुल्लडबाजी केली. काही प्रवाशांनी इमर्जन्सी विंडो आणि दरवाजाला लटकून आत शिरण्याचा प्रयत्न केला. जागा पकडण्याच्या नादात एकमेकांना धक्का लागून चेंगराचेंगरी झाली, असे कारण रेल्वे प्रवाशांनी दिले आहे.
सुरक्षा व्यवस्था तोकडी पडली
दरवर्षी वांद्रे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते. दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेशात जाण्यासाठी शनिवारी रात्रीही अशीच प्रवाशांची गर्दी उसळली. प्रवासी गाडीची वाट पाहात कॉरिडॉर, रेल्वे स्थानकात शिरण्याचा मार्ग असो किंवा आणखी कुठलीही जागा बस्तान मांडून बसलेले असतात. अशावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे असतानाही शनिवारी रेल्वे स्थानकात सुरक्षा व्यवस्था तोकडी पडल्याचे चित्र होते. एक्स्प्रेस नियोजित वेळेत सुटण्याच्या काही तास अगोदर रेल्वे गाडी फलाटावर लागते. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान प्रवाशांना रांगेतून सोडतात. अनेक प्रवाशांनी त्यांच्यासोबत साहित्य आणि बॅगाही आणल्या होत्या. ते सर्व घेऊन प्रवासी एक्स्प्रेसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी रेल्वे पोलीस, सुरक्षा दलाचे नियोजन कमी पडल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे समोर आले आहे.
पाठीला, मांडीला गंभीर दुखापत
काही प्रवाशांच्या हाताला, पाठीला तर इंद्रजिती साहनी यांच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. आठ प्रवाशांवर भाभा तर एका गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद नावाच्या प्रवाशावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. दरम्यान, घटना नेमकी कशी घडली, त्याला जबाबदार कोण, सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी फलाटावर असलेल्या सीसीटीव्हीची पोलीस तपासणी करणार आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सात जखमींचे जबाबही नोंदवले आहेत. जखमी प्रवाशांना डय़ुटीवर असलेल्या आरपीएफ, जीआरपी, होमगार्ड यांच्या मदतीने जवळच्या भाभा रुग्णालयात भरती करण्यात आले. सर्व जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. चालत्या ट्रेनमध्ये कुणीही चढू नये, दिवाळीनिमित्त 130 विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत, असे प्रसिद्धीपत्रक पश्चिम रेल्वेने काढले आहे.
रेल्वे प्रशासन म्हणते, दोनच जखमी
रेल्वे स्थानकात प्रचंड चेंगराचेंगरी होऊनही प्रवाशांच्या जिवावर बेतले असतानाही आणि रेल्वे पोलीस तसेच सुरक्षा दलाने 9 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती दिली असतानाही पश्चिम रेल्वे प्रशासनाने मात्र दोनच प्रवासी जखमी झाल्याचे म्हटले आहे.
खिडकीतून आत घुसण्याचा प्रयत्न
एक्स्प्रेस रेल्वे स्थानकात शिरताना एका प्रवाशाने गाडीच्या खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वीही झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांनी इतक्या लांबच्या प्रवासासाठी जागा पकडण्याच्या हिशोबाने खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी अनेक प्रवासी खिडकीवर चढल्याने आणि दरवाजावर लटकल्याने प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडून जखमी झाले.
प्लॅटफॉर्म तिकीट बंद
वांद्रे येथील घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री थांबवण्यात आली असून 8 नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय लागू असेल.
‘रील’ मंत्र्यांनी कधीतरी रेल्वेमंत्री म्हणून काम करावे
वांद्रे टर्मिनसवर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर जोरदार टीका केली. ‘रील’ मंत्र्यांनी कधीतरी रेल्वेमंत्री म्हणूनही काम करायला हवे, असा टोला त्यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टमधून संताप व्यक्त केला. ‘विद्यमान रेल्वेमंत्री किती अकार्यक्षम आहेत हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील प्रभारी बनवले आहे. परंतु दर आठवडय़ाला काही ना काही रेल्वे दुर्घटना घडतच आहेत. रेल्वेला अशा असमर्थ मंत्र्याच्या हातात देणे लज्जास्पद आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.