वांद्रे टर्मिनसवर 14 एप्रिल 2020 रोजीही हजारो प्रवाशांची गर्दी उसळली होती. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे उत्तर प्रदेशातील नागरिक कोरोना काळात मुंबईत अडकावे लागू नये म्हणून वांद्र्यात जमा झाले होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे वांद्र्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वे प्रशासनाने श्रमिक विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु त्या वेळीही गर्दीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नव्हते. त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाला करावे लागले होते. हीच नामुष्की आज वांद्रे टर्मिनसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे पश्चिम रेल्वेवर ओढवली.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनसवरून बिहारसाठी मे 2020 मध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. या ट्रेनसाठी सुमारे 1 हजार 700 प्रवाशांनी नोंदणी केली होती. नोंदणीकृत कामगार, मजूर सकाळी 11 वाजल्यापासून वांद्रे टर्मिनसवर जमा झाले. रेल्वे प्रशासनाकडून नोंदणीकृत मजुरांची तपासणी करून रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात होता. परंतु या मजुरांमध्ये अनेक प्रवाशांची नोंदणी झाली नव्हती. त्यामुळे रेल्वे परिसरात एकच गोंळ उडाला. अखेर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून आला.