पूजा विधी पडला 12 लाखाला भीती दाखवून पैसे उकळले

अ‍ॅपच्या माध्यमातून ओळख झालेल्या एकाने पूजा विधीच्या नावाखाली तरुणाला 12 लाख 21 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. तरुणाने या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.वांद्र्यात राहणाऱ्या या तक्रारदार तरुणाने जानेवारीत भविष्य जाणून घेण्याकरिता एक अ‍ॅप डाऊनलोड केले. अशातच अ‍ॅपच्या माध्यमातून एक जण त्याच्या संपर्कात आला.

आयुष्यात स्थिरता आणायची असल्यास पूजा विधी करावा लागेल, असे त्याने सांगितले. त्यासाठी आधी 6300 रुपयांची मागणी केली. अशा व्यक्तीच्या सांगण्यावरून त्याने पूजा करण्याकरिता एका महाराजाशी संपर्क साधला. त्याला 6300 रुपये पाठवले. परंतु हे पैसे सल्ला सेवेचे असून प्रत्यक्ष विधींकरिता वेगळा खर्च येईल, असे त्याला सांगण्यात आले.

तरुणाने पुन्हा पैसे पाठवले. पूजा केल्यानंतर फोटो पाठवतो, असे महाराजाने सांगितले. रात्री महाराजाने त्याला फोन केला. पूजा अपूर्ण राहिली आहे, पैसे पाठव, असे त्याला सांगण्यात आले. आधी तरुणाने पैसे पाठवण्यास नकार दिला. मात्र पूजा अर्धवट सोडली तर जिवाला धोका निर्माण होईल, अशी भीती घालण्यात आली. त्यावर त्याने ऑनलाईन आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर वारंवार पूजा अर्धवट राहिली आहे. जिवाला धोका राहील, अशी भीती दाखवून 12 लाख रुपये उकळले.