बस कंडक्टरवर हल्ला करणाऱ्या दोघांना तुरुंगवास

बेस्ट बसच्या कंडक्टरवर हल्ला करणाऱया दोघांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 75,000 रुपये दंड ठोठावला. रिक्षाचालकाने बससमोर रिक्षा अडवली होती. ती रिक्षा बाजूला करण्यास सांगितल्याने वाद झाला आणि रिक्षाचालकाने बस कंडक्टरवर हल्ला केला होता. डिसेंबर 2012 मध्ये वांद्रे परिसरात ही घटना घडली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी दोघा आरोपींना दोषी ठरवले. आरोपींकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी 50,000 रुपये पीडित मनोहर रामचंद खत्री यांना भरपाई म्हणून देण्याचे तसेच 50,000 रुपये बेस्ट महाव्यवस्थापकांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

15 डिसेंबर 2012 रोजी प्रतीक्षानगर व सांताक्रुझ रेल्वे स्थानक यादरम्यान धावणाऱया बस क्रमांक 315 च्या कंडक्टरवर हल्ला झाला होता. सकाळी 8.45 वाजता वांद्रे पूर्वेकडील हनुमान मंदिराजवळ रिक्षाचालक शौहरब अली रुस्तम अली हाश्मीने बेस्टची बस अडवली. यावेळी चालक चंद्रशेखर सोनसुरकर यांनी हाश्मीला रिक्षा बाजूला करण्यास सांगितले. तेव्हा हाश्मीने रिक्षा बाजूला करण्यास नकार दिला आणि हा माझा परिसर आहे. मला वाटेल तिथे मी माझी रिक्षा पार्क करेन, असे सांगितले. त्यावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी कंडक्टर खत्री यांनी हस्तक्षेप केला, हाश्मीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच दुसरा आरोपी नवाब अली पुढे आला. त्याने खत्री यांचा गणवेशाचा कॉलर पकडला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी लाकडी फळीने खत्री यांना मारहाण केली. त्यात त्यांच्या कपाळाला व उजव्या हाताला दुखापत झाली. बसचालकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या प्रकरणात सरकारी वकिलांनी चार साक्षीदारांचा जबाब नोंदवला. त्याआधारे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले आणि तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली.