बुडत्याचा पाय खोलात, न्यायालयाचा दणका; घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी! पत्नी करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना आज प्रथमदर्शनी दोषी ठरवले. अर्जदार करुणा मुंडे यांनी केलेले आरोप सकृतदर्शनी मान्य करत न्यायालयाने मुंडे यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आणि करुणा मुंडे यांना 1 लाख 25 हजारांची पोटगी व मुलगी शिवानी हिला 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना दिले.

करुणा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचे तक्रारीत म्हटले असून त्यांना दोन मुले आहेत. मुंडे यांच्या समर्थकांकडून आपल्याला व कुटुंबीयांना मारहाण केल्याचे तसेच धमकावण्यात आल्याने करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. महिन्याला 5 लाख रुपये पोटगी तसेच 25 कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी करुणा यांनी केली असून त्यांच्या तक्रार अर्जावर वांद्रे कौटुंबिक न्यायालयात सुनावणी झाली. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. जाधव यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्या वतीने अॅड. कोल्हे यांनी युक्तिवाद करताना हे आरोप फेटाळून लावले, तर करुणा यांच्या वतीने अॅड. सिंग यांनी बाजू मांडताना धनंजय मुंडे यांनी आपल्या अशिलाला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने त्या पोटगी मिळण्यासाठी पात्र असल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने करुणा मुंडे यांना अंतरिम दिलासा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना 1 लाख 25 हजारांची पोटगी, तर मुलगी शिवानी हिला तिचे लग्न होईपर्यंत 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले.

ताबडतोब हाकला!

धनंजय मुंडे यांचे अनेक गैरप्रकार आता पुढे येत आहेत. करुणा मुंडे यांनी केलेले आरोप असोत की कृषी खात्यात केलेला गैरकारभार पुराव्यानिशी सर्वांसमोर आलेला आहे. त्यामुळे त्यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी होत आहे. मुंडे यांना आता तरी मंत्रीपदावरून हटवा, म्हणजे थोडी तरी इभ्रत राहील, असे कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

न्यायालय काय म्हणाले?

  • परळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेल्या माहितीनुसार करुणा ही त्यांची पहिली पत्नी असून त्यांना दोन मुली आहेत.
    धनंजय मुंडे आणि करुणा यांचे संबंध असल्याचे पुराव्यांवरून प्रथमदर्शनी स्पष्ट होते. असे असताना धनंजय मुंडे वैवाहिक नात्याचा इन्कार करत आहेत.
  • धनंजय मुंडे यांनी भविष्यात कोणताही कौटुंबिक हिंसाचार करू नये.
    करुणा या व्यावसायिक असल्या तरी त्यांचे उत्पन्न त्यांच्यासाठी व त्यांच्या मुलांसाठी आयुष्यभर पुरणारे आहे असे दिसत नाही.
  • धनंजय मुंडे यांच्या उत्पन्नाचे स्रोत व त्यांचे राहणीमान पाहता त्यांनी करुणा व मुलांच्या पालन पोषणासाठी महिन्याकाठी 2 लाख रुपये त्यांना द्यावेत.