महिलेला आळशी म्हणून चिडवणे हा कौटुंबिक छळच, वांद्रे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महिलेला आळशी म्हणून चिडवणे, तिला सकाळी लवकर उठण्यास भाग पडणे हा कौटुंबिक छळच आहे, असा महत्वपूर्ण निर्णय वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सायन येथील महिलेने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कौटुंबिक छळापासून संरक्षण मिळवण्यासाठी दाद मागितली होती. न्यायालयाने तिच्या अर्जाचा स्वीकार केला आणि तिला पोटगी व भरपाई देण्याचा आदेश पतीला दिला.

अर्जदार महिलेचे 1 मार्च 2016 रोजी लग्न झाले होते. लग्नावरील 6 लाख रुपयांचा खर्च तिच्या आईवडिलांनी केला. मात्र लग्नात मिळालेल्या गिफ्टवर सासरचे लोक समाधानी नव्हते. त्यांनी तिच्याकडे 2 लाख रुपयांचा हुंडा आणण्यासाठी तगादा लावत छळ सुरू केला होता. सासरच्या जाचाला कंटाळून तिने माहेर गाठले आणि सासरच्या मंडळींपासून संरक्षण तसेच दैनंदिन खर्चासाठी पतीकडून पोटगी मागत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. सासरचे लोक आळशी म्हणून चिडवतात. सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. हुंड्यासाठी सतत मारझोड करतात, असा दावा तिने केला होता. तिचा दावा न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांनी मान्य केला आणि तिच्याबाबतीत घडलेले प्रकार कौटुंबिक छळच आहे, असे निरीक्षण नोंदवले.

पोटगी व भरपाई देण्याचा आदेश

अर्जदार महिलेचा कौटुंबिक छळ झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि तिला पोटगी व भरपाई मंजूर केली. महिलेला तिने अर्ज केल्याच्या तारखेपासून डिसेंबर 2024 पर्यंत दरमहा 4 हजार रुपयांची पोटगी तसेच जानेवारी 2025 पासून दरमहा 7 हजार रुपयांची पोटगी आणि पर्यायी घराच्या भाड्यापोटी 3 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले. त्याचबरोबर 10 हजार रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचाही आदेश दिला.