कोळशावरील तंदूर चिकन, रोटी भट्ट्यांवर बंदी; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पालिकेकडून कठोर, अंमलबजावणी, 110 जणांना पालिकेकडून नोटीस

मुंबईमध्ये कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण आणि उष्णतेत वाढ होत असल्यामुळे लवकरच कोळशावर चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवर बंदी घालण्यात येणार आहे. या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि पीएनजीवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रदूषण नियंत्रणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठीच पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यासाठी 110 जणांना पालिकेने नोटीसही बजावण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. यामध्ये विशेषतः बांधकामांची धूळ आणि बेकऱ्यांसह ढाबे, हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जळणासाठी वापरले जाणारे लाकूड, प्लायवूड यामधून  मानवी शरीराला घातक ठरणारा विषारी वायू बाहेर पडत आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून आता तंदूर चिकन, रोट्या बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्ट्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. याआधी बेकऱ्या आणि तंदूर भट्ट्यांचे रूपांतर इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती. तर आता ही मुदत फक्त सहा महिन्यांची करण्यात आली आहे. याबाबत संबंधितांनी आवश्यक कार्यवाही केली नाही तर संबंधित व्यवसायाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला.

प्रदूषणकारी बेकऱ्याही रडारवर

पालिकेच्या झाडाझडतीत मुंबईत सुमारे 300 बेकऱ्यांमध्ये जळणासाठी लाकूड, प्लायवूडसारखे पदार्थ वापरले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने संबंधित बेकऱ्यांनाही सहा महिन्यात भट्ट्या सीएनजी किंवा इलेक्ट्रिक करण्याबाबत नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत 29 बेकऱ्यांनी आपल्या भट्ट्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक करण्याची कार्यवाही केली आहे.

पालिकेच्या कारवाईनंतर 311 जण ताळ्यावर

मुंबईतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने 28 प्रकारची नियमावली पालिकेने जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात सुरू असणाऱ्या सर्व पाच हजारांवर बांधकाम आणि प्रकल्पांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहे.

यामध्ये पालिकेच्या पाहणीत प्रदूषणकारी ठरणाऱ्या 1381 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर निर्धारित एक महिन्याच्या मुदतीत 311 जणांनी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करून पालिकेला रिपोर्ट दिला आहे.