आद्य मराठी पत्रकार, ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन, राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

आद्य मराठी वृत्तपत्रकार, संपादक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 जानेवारी रोजी राज्य सरकार आणि विविध पत्रकार संघटनांच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दर्पण’कारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा संकल्प यानिमित्ताने केला जाईल. जांभेकर यांच्या सिंधुदुर्गातील जन्मगावी पोंभुर्ले येथे उद्या विशेष कार्यक्रम होणार आहे.

6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित करून मराठी वृत्तपत्राचा पाया रचला. त्याला यंदा 193 वर्षे पूर्ण होत आहेत. जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रथम पाक्षिक म्हणून सुरू झाले. 4 मे 1832 पासून मराठी, इंग्रजी अशा दोन्ही भाषांत हे वृत्तपत्र प्रकाशित केले जाई. ‘दर्पण’ म्हणजे आरसा. सद्यःस्थितीचे खरेखुरे दर्शन वृत्तपत्राच्या माध्यमातून घडवून झोपलेल्या समाजाला जागे करणे हाच या नावामागील बाळशास्त्रीचा हेतू होता. यामुळेच ‘दर्पण’मधून मुलकी व न्याय खात्यातील अधिकाऱ्यांची माहिती तसेच वैज्ञानिक घडामोडी, स्त्राrशिक्षण, विधवा पुनर्विवाह आदी सामाजिक प्रश्नांवर जहाल लिखाण झाले. प्रामुख्याने विधवा पुनर्विवाहाची चळवळच ‘दर्पण’मधील लिखाणामुळे उभी राहिली.

‘दर्पण’कारांच्या स्मरणार्थ सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषदेने कार्यक्रम आयोजित केले आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या ‘दर्पण’कारांच्या जन्मगावी 30 वर्षांच्या परंपरेनुसार महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या वतीने कार्यक्रम होईल. यावेळी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत संस्थेच्या ‘राज्यस्तरीय दर्पण’ पुरस्काराचे वितरण होईल.

पालिकेने पत्रव्यवहारात पत्त्यामध्ये बदल करावा

17 मे 2005 रोजी मुंबई महानगरपालिका परिसरातील चौकाला ‘दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर चौक’ असे नाव देण्यात आले. यासंदर्भात मराठी भाषा चळवळ अभ्यासक महादेव गोविंद ऊर्फ भाऊ सावंत यांनी तत्कालीन महापौरांना पत्र लिहिले होते. त्याबाबत मुंबई मराठी पत्रकार संघानेही पाठपुरावा केला होता. मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या कार्यालयीन पत्रव्यवहारात ‘दर्पणकार बाळशास्त्राr जांभेकर चौक, महापालिका मार्ग, मुंबई 400001’ असा पत्ता असावा यासाठी भाऊ सावंत गेली काही वर्षे प्रयत्न करत आहेत.