ईव्हीएम घोटाळ्याचा पर्दाफाश होईल म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी प्रचंड दडपशाही करत माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत होणारी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया रोखली. जमावबंदी लागू करतानाच गावाकडे येणारे रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले. सशस्त्रे पोलिसांसह दंगल नियंत्रण पथके तैनात करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण केली गेली. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या मारकडवाडीतील मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान रद्द करण्यात आले. दरम्यान, लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार असून लवकरच भव्य मोर्चा काढू, असे माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये मोठा झोल झाल्याच्या तक्रारी आहेत. माळशिरस मतदारसंघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांना मारकडवाडी गावात अत्यल्प मते मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रशासनाने परवानगी दिली नाही. तरीही मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या आणि दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. स्वखर्चाने ग्रामस्थांनी मतदानाची पूर्ण तयारी केली आणि आज मतदान घेण्याचे जाहीर केले. मात्र पोलिसांनी दडपशाही करून बॅलेटद्वारे मतदान होऊ दिले नाही.
संपूर्ण तयारी, आबालवृद्धांसह तरुणांचा उत्साह… पोलिसांची दडपशाही
- गावात 2300 मतदार आहेत. मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मतदार याद्या, शाई, शिक्के, मतपत्रिका तयार होत्या.
- सोमवारपासूनच गावात मोठा पोलीस बंदोबस्त होता. मात्र आज सकाळी आठच्या सुमारास आणखी फौजफाटा आला. सशस्त्रे पोलीस आणि दंगल नियंत्रणची दोन पथकेही गावात आली. गावाकडे येणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले. गावकऱयांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
- पोलिसांनी स्पीकरवरून ‘‘एकाने जरी मतपत्रिकेद्वारे मतदान केले तर गुन्हा दाखल होईल. परवानगी नसताना बॅलेट पेपरवर मतदान घेणे बेकायदेशीर आहे,’’ असा इशारा दिला. गावात जमावबंदी आदेश असल्याने पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्या.
- गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर सोमवारपासून घटनास्थळी तळ ठोकून होते. डीवायएसपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी आमदार जानकर यांच्याशी चर्चा केली आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान घेऊ नये, असे सांगितले. अखेर सकाळी 10.30च्या सुमारास आमदार जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बॅलेटद्वारे होणारी मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले.
मारकडवाडीत प्रशासनाची दडपशाही; राज्यात उद्रेक होईल – सिद्धराम म्हेत्रे
मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान चाचणीचा शासन आणि प्रशासनाच्या दडपशाहीचा सर्वत्र विरोध होत असून जर अशीच स्थिती राहिली तर राज्यात उद्रेक होईल, असा इशारा राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी दिला आहे.
20 तारखेला आम्ही उत्तम जानकर यांना मतदान केलं आहे; पण हे मत ईव्हीएम मशीनमध्ये दिसत नाही. त्यामुळे आमचं मत कुठं गेलं याचा शोध घेण्यासाठी गावकऱयांनी आज मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होत़ा मात्र, पोलिसांचा दबाव आहे. जत्रेत मारामारी झाली तेव्हा एवढय़ा पोलिसांच्या गाडय़ा कधी आल्या नव्हत्या, आज मात्र आल्यात. आम्ही मतदान करणारच. पोलिसांची कसली भीती? आमचं आता ढगात जायचं वय झालंय, ’ – रूपाराज मारकड, माजी सरपंच, मारकडवाडी
म्हणून गावकऱ्यांना संशय
आमदार उत्तम जानकर म्हणाले, माळशिरस मतदारसंघातून मला एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. मात्र अवघ्या तेरा हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. तुतारीला एक मत मिळाल्यानंतर दुसरे मत हे आपोआप कमळाकडे जात असावे, असा आमचा संशय आहे. माळशिरस मतदारसंघातून मी तीन वेळा निवडणुका लढविल्या आहेत़ प्रत्येक निवडणुकीत मला मारकडवाडी गावातून मताधिक्य मिळाले आहे. याच निवडणुकीत मताधिक्य का घटले याचा गावकाऱयांना संशय आहे. म्हणून गावकऱयांनी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रक्रिया पार पडली असती तर ईव्हीएम मशीनचा नेमका झोल उघड झाला असता. मात्र निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही. उलट मतदान प्रक्रिया राबविली तर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असे त्यांनी सांगितले.
बिंग फुटू नये म्हणून मतपत्रिकेवर मतदानास मज्जाव – पटोले
मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. पण पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून गावकऱयांना मतदान करू दिले नाही. मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱयांना मतपत्रिकेवर मतदान करू दिले नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. मारकडवाडीमध्ये प्रशासन अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे वागल्याने ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ते अधिक गडद झाले आहे. ‘कर नाही तर डर कशाला?’ याप्रमाणे प्रशासनाने हे मतदान पार पडू द्यायला हवे होते. पण भाजप सरकारच्या काळात सर्व सरकारी यंत्रणाच दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे सोलापूर पोलिसांनी त्यांना ‘वरून’ आलेल्या आदेशाची फक्त अंमलबजावणी केली. मारकडवाडीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनतेचा आवाज दाबण्याचाच प्रकार झाला आहे आणि हाच लोकशाही आणि संविधानाचा खून आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
ईव्हीएमचा झोल आम्ही शोधू – जानकर
मतदान प्रक्रिया पुन्हा घेण्यासाठी गावातील आबालवृद्ध आग्रही होते. मतदान घेतले असते तर त्यांच्यावर अकारण गुन्हे दाखल झाले असते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावकरी आणि मी स्वतः मतदान स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आजचे मतदान रद्द केले असले तरी ईव्हीएमचा झोल हा प्रत्येकाच्या मनात आहे, ते शोधण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करू, असे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.
ईव्हीएमविरोधात वंचितची स्वाक्षरी मोहीम
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या मदतीने मतदानात फेरफार करून मोठा घोटाळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासंदर्भातील काही धक्कादायक माहिती विविध मतदारसंघांतून पुढे येत असून निवडणुकीत ईव्हीएमचा वापर नको, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनेही ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम स्वाक्षरी करत आज या मोहिमेची सुरुवात केली.