जनतेचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुम्ही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास का घाबरता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास 33 कोटी देवही भाजपला वाचवू शकणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे ते बोलत होते.
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकाही भाजपला जिंकता येणार नाहीत, असे वातावरण या देशात आहे. या देशात मोदींचे राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकूमशाहीचे राज्य आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये ईडीविरोधातील लोकांचा संताप दिसून आला. उद्या ईव्हीएमच्या मुद्दय़ावरून जनता रस्त्यावर आली आणि अराजक माजले तर त्याला हे सरकार जबाबदार असेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे. दोन ते चार दिवसांत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आम्ही अंतिम चर्चा करून अंतिम मसुदा ठरवू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
जनताच आता भूपंप घडवील
‘दहा दिवसांत राज्यात भूपंप होणार’ या भाजप मंत्र्यांच्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, ईडी, सीबीआयचा वापर करून विरोधकांवर धाडी टाकणे याला भूकंप म्हणत नाही. 2024 च्या निवडणुकीत जनताच भूकंप घडवून भाजपला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. नाशिक येथे होणाऱया पंतप्रधानांच्या रोड शोबाबत राऊत म्हणाले की, प्रधानमंत्र्यांना फक्त तेवढंच काम आहे. रोड शो करायचं. तिकडे मणिपूरला का गेले नाही? कश्मिरी पंडितांचं काय झालं, यावर पंतप्रधान का गप्प आहेत. यावेळी शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे उपस्थित होते.