बळीराम घाग यांचे निधन

शिवसेनेचे कलिना विधानसभेचे उपविभागप्रमुख बळीराम भिकू घाग यांचे आज सायं. 5 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्यावर वाकोला येथील निरलॉन रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याआधी ते महिनाभर नानावटी रुग्णालयात दाखल होते.

उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान त्यांचे पार्थिव वाकोला येथील सिल्वर कॉईन बिल्डिंग या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर त्यांच्या पार्थिवावर रायगडच्या माणगांव तालुक्यातील ढाकशेळी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख ते नगरसेवक अशी त्यांची कारकीर्द राहिली. 2007 ते 2012 दरम्यान ते नगरसेवक होते. 2 वेळा त्यांनी प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषवले. तसेच ते माणगाव तालुकासंपर्क प्रमुखही होते. त्यांनी रामेश्वर शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आणि रामेश्वर सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही काम पाहिले होते. सध्या ते कलिना विधानसभा क्षेत्राचे उपविभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते सार्वजनिक शौचालयापर्यंत कुठल्याही कामासाठी आणि कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी ते 24 तास उपलब्ध असायचे. अतिशय मनमिळावू आणि एका हाकेला धावून जाणारा शिवसेनेचा सच्चा आणि हाडाचा कार्यकर्ता तसेच आपला माणूस हरपल्याने कलिना विधानसभा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.