महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वतीने समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. विजयी उमेदवारांचा चांगला आकडा गाठणे हे लोकशाहीतले गणित असते. महाविकास आघाडीनेही बहुमताचा आकडा कसा गाठता येईल याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने सक्षम उमेदवार आणि जागांबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे थोरात यांनी या भेटीनंतर सांगितले.
समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी चर्चा करतो, पण जागांचे निर्णय समिती घेते. समितीला अनुकूल वातावरण निर्माण करणे हे माझे काम आहे, असे थोरात म्हणाले.
आकडय़ांची टोटल केलीच नाही
काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याचे बोलले जाते, असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाळासाहेब थोरात यांना यावेळी विचारले. त्यावर काँग्रेसने आकडय़ाची टोटल केलीच नाही; कारण सर्व प्रक्रिया सुरू होती आणि सक्षम उमेदवार देणे हाच विषय होता, असे थोरात यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी बहुमताने सत्तेवर यावी हे आमचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.
प्रचार सभा, संयुक्त बैठकांचेही नियोजन
चर्चा केवळ जागांबाबत किंवा उमेदवारांबाबत होत नाही, तर निवडणुकीतील कार्यक्रमांच्या नियोजनावरही होते. निवडणुकीदरम्यान सभा, बैठका आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभा होणार आहेत. काही संयुक्त सभाही आहेत, असे थोरात यांनी सांगितले.