विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभव सहन करावा लागला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनाही आपला गड टिकवता आला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सलग आठ विजयानंतर पराभवाचे तोंड पहावे लागले. यामुळे खचून न जाता बाळासाहेब थोरात पुन्हा मैदानात उतरले आहेत. मंगळवारी यशोधन संपर्क कार्याजवळील मैदानावर त्यांनी स्नेहसंवाद मेळावा घेतला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना थोरात यांनी आपापसातील मतभेद दूर करा, सगळी दुरुस्ती होईल असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. संकटे आली तरी घाबरायचे नाही. स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. जनता आपल्या सोबत असल्याने आपण लढणार आहोत असे थोरात यांनी म्हटले.
हा पराभव नाही तर घात – डॉ. तांबे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही मात्र जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी संस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला असल्याची टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.