बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत उद्या एक लाख विद्यार्थी भरणार रंग! मुंबईभरात 48 ठिकाणी होणार आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत या वर्षी तब्बल एक लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार, 12 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत 48 उद्यानांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱया रविवारी ‘महापौर आयोजित’ ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यानुसार यंदादेखील महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि उप आयुक्त प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही बालचित्रकला स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे यंदा 16 वे वर्ष आहे. सर्व शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केले आहे.

असे आहेत विषय
या वर्षीदेखील ही स्पर्धा एकूण 4 गटांत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक 1 करिता 3 विषय ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ’मी आणि फुलपाखरू’, ’मी आजीच्या कुशीत’, ’मी व माझा मित्र / मैत्रीण’ असे 3 विषय आहेत. तर इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक 2 करिता ’आम्ही पतंग उडवितो’, ’आम्ही अभ्यास करतो’, ’आम्ही राणीच्या बागेत’ असे विषय आहेत.

इयत्ता सहावी ते आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक 3 करिता ’आमच्या शाळेची परसबाग’, ’आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवितो’, ’आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो’ असे विषय आहेत. तर इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक 4 करिता 3 विषय निश्चित करण्यात केले आहेत. यामध्ये ’महानगर मुंबई/मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई’, ’महिला सशक्तीकरण, ’जलसंवर्धन’ असे विषय आहेत.

25 हजारांचे बक्षीस
एकूण चार गटांत ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम येणाऱया विद्यार्थ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय (प्रत्येकी 20 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक), तृतीय (15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक), याशिवाय प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून (प्रत्येकी 5 हजार रुपये आणि पारितोषिक) देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात 5 याप्रमाणे चार गटांत 20 याप्रमाणे एकूण 25 प्रशासकीय विभागांमध्ये 500 उत्तम चित्रांना प्रत्येक 500 रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.