हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला 23 जानेवारी रोजी अंधेरी येथे शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. नव्या वर्षात उद्धव ठाकरे यांची तोफ पहिल्यांदाच धडाडणार आहे. अंधेरी पश्चिम, आझाद नगर, वीरा देसाई रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी 6 वाजता हा मेळावा होणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार नियोजन केले जात आहे. या मेळाव्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक डेरेदाखल होणार आहेत. शिवाय राज्यभरातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थितीदेखील मेळाव्याला राहणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांची भाषणे होणार असून प्रमुख मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे.
क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे 21 आणि 22 जानेवारी रोजी भव्य क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांनाही या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणार
शिवसैनिकांचे दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनचरित्र मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणारे ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त होणाऱया या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारी दृष्ये दाखवली जाणार आहेत.
नव्या वर्षाच्या प्रारंभीच धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीनंतर पहिलीच सभा असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे नव्या वर्षात शिवसैनिक आणि अवघ्या महाराष्ट्राला कोणती दिशा देतात आणि कोणता आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.