जागृती मंचचा स्पर्धा महोत्सव उत्साहात, मुंबईसह राज्यभरातील स्पर्धकांनी घेतला सहभाग

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त वरळी विधानसभेचे उपविभागप्रमुख राम साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या स्पर्धा महोत्सवाला मुंबईसह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पाककला, एकपात्री अभिनय स्पर्धा तसेच इतर स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे माध्यम प्रायोजक दैनिक ‘सामना’ होते.

जागृती मंच गेली 26 वर्षे सातत्याने गिरणगावात प्रामुख्याने डिलाईल रोड, लालबाग, भायखळा, शिवडी, वरळी, दादर या भागातील शिशु वर्गातील विद्यार्थी, युवक-युवती, महिला ते ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करत आहे. चित्रकला स्पर्धेपासून ते एकपात्री अभिनय स्पर्धा, स्टॅण्ड अप कॉमेडी, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रिकेट, महिलांकरिता खास करून पाककला, होम मिनिस्टर त्याचप्रमाणे मराठी मातीतील पारंपरिक खेळ म्हणजेच रस्सीखेच स्पर्धा याचे आयोजन करत हा स्पर्धा महोत्सव व्यापक स्वरूपाचा झाला आहे. यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना अशा अनेक जिह्यांतून हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

पाककला स्पर्धा

पाककला स्पर्धेत 171 महिलांनी ‘हिवाळय़ातील पौष्टिक पदार्थ’ या विषयाला अनुसरून पाककृती सादर केली. स्पर्धेच्या शुभारंभाला ‘लिटिल चॅम्प’ स्वरा जोशी हिने गणरायाचे स्तवन करून सुंदर गीत सादर केले. स्पर्धेचे परीक्षण नामवंत शेफ तुषार देशमुख, शेफ अनिस देशमुख, शेफ आरती निजापकर, शेफ मिहीर जोहरी, शेफ अर्चना आर्ते आणि ‘युटय़ूबर’ संभाजी आटुगडे यांनी केले. प्रथम क्रमांक स्वाती श्रीवर्धनकर, द्वितीय क्रमांक माधुरी घाडीगावकर तर तृतीय क्रमांक कृपाली सावे, चतुर्थ क्रमांक वर्षा भुजबळ, पाचवा क्रमांक स्नेहलता खणकर यांनी पटकावला. विजेत्या महिलांसह एकंदरीत 13 महिलांना प्रावीण्य पुरस्कार व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

एकपात्री अभिनय स्पर्धा

एकपात्री अभिनय स्पर्धेत 37 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या परीक्षण ज्येष्ठ सिने व नाटय़ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी केले तर नियोजन जागृती मंचाचे सहसचिव तुषार होडगे यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कार्तिकी दळवी, द्वितीय क्रमांक पूजा घोडके, तृतीय क्रमांक संग्राम लवटे, उत्तेजनार्थ अक्षता साळवी, कुणाल रेळेकर व शरयू गोसावी यांनी पटकावला.