नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये लाथाळय़ा, कल्याणकर यांचा अशोक चव्हाण यांच्यावर थेट आरोप

विधानसभा निवडणुकीचे कवित्व आता बाहेर येऊ लागले असून, भाजपात नव्याने आलेल्या मंडळींनी मला पाडण्यासाठी मतदारांना पैसे वाटले, असा खळबळजनक आरोप नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी एका सभेत केला आहे. तर हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण म्हणजे भाजप नसल्याचे सांगून भाजपला घरचा आहेर दिला.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आभार मेळाव्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मागच्या निवडणुकीत 50 हजार मतांनी विजयी झालो. मात्र यावेळी हे मताधिक्ॊय अडीच हजारांवर आले. माझ्या नांदेड उत्तर मतदारसंघात भारतीय जनता पक्षात नव्याने आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात उघड उघड प्रचार केला. मला पाडण्यासाठी मतदारांना पैसे वाटले, त्यामुळे मला मताधिक्य कमी पडले. त्यांचा थेट रोष अशोक चव्हाणांवरच होता.

स्वतंत्र लढण्याची खुमखुमी असेल तर आमची तयारी – प्रताप चिखलीकर

दुसरीकडे चव्हाणांचे कट्टर विरोधक आणि लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वबळाचा नारा देणारे अशोक चव्हाण हे भाजपचे नेते आहेत का, हे अगोदर त्यांनी तपासावे, स्वतंत्र लढण्याची कुणात खुमखुमी असेल तर अजित पवार गटही तयार असल्याचा इशारा दिला. आम्ही स्वतŠहून युती धर्म तोडणार नाहीत, पाडापाडीचे राजकारण कुणी केले हे जनतेला सर्व माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

याच बैठकीत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, अशोक चव्हाणांनी नुकताच स्वबळाचा नारा दिला. मात्र, ते भाजपचे सर्वेसर्वा आहेत का? त्यांना हा अधिकार कुणी दिला? विधानसभा निवडणुकीत राज्याचे नेते म्हणून मिरवणाऱ्या चव्हाणांना मुलीच्या विजयासाठी भोकर मतदारसंघ पेंद्रित करावा लागला. अन्य कुठल्या जिल्हय़ात त्यांच्या सभा झाल्या नाहीत. तेथे त्यांची दमछाक झाली. जिल्हय़ात नऊच्या नऊ ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आले. काही ठिकाणी भाजपच्या मंडळींनी आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात ते यशस्वी ठरले नाहीत. स्वबळाचा नारा दिल्यानंतर आपण याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्याचे ते म्हणाले.