भाजपात गेलो तर निलंबनही हटवले जाईल

माझ्यावरील निलंबनाची कारवाई ही केवळ सरकारने सूडभावनेतून टाकलेले पाऊल आहे. मी आता भाजपमध्ये गेलो तर माझ्यावरील निलंबनाची कारवाईसुद्धा मागे घेतली जाईल, असा दावा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू बजरंग पुनियाने केला आहे. गेल्या 23 एप्रिलला उत्तेजक सेवन चाचणीसाठी नमूना देण्यास नाडाला नकार दिल्यामुळे चार वर्षांसाठी पुनियाला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे पुढे त्याच्यावर जागतिक कुस्ती संस्थेनेही निलंबनाची कारवाई केली होती.

तीन महिन्यांपूर्वीच पुनिया आणि विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आपण महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी गेली दीड वर्ष आंदोलनात सहकार्य करत असल्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई ही केवळ सूडभावनेतून करण्यात आली आहे. मी कधीही ‘नाडा’ला नमुना देण्यास नकार दिलेला नाही. जेव्हा ते चाचणीसाठी माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांनी एक्सपायरी डेट असलेले किट आणले होते. त्या किटचा फोटो मी तेव्हाच सोशल मीडियावर पोस्ट केला होता. गेली 10-12 वर्षे मी स्पर्धा खेळतोय आणि मी प्रत्येक स्पर्धेत आणि हिंदुस्थानात होत असलेल्या शिबिरांमध्ये नमुना देत आलोय. पण सरकारचे ध्येय आम्हाला तोडणे आणि झुकवणे एवढेच आहे. जर मी भाजपमध्ये प्रवेश करतो तर माझ्यावरील निलंबनाची कारवाईसुद्धा मागे घेतली जाईल. पण माझ्यावर लादण्यात आलेली कारवाई म्हणजे माझी कारकीर्द संपवण्याचा डाव आहे. या निलंबनामुळे मी 22 एप्रिल 2028 पर्यंत कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. याशिवाय मी परदेशात प्रशिक्षकाच्या नोकरीसाठीही अर्ज करू शकणार नसल्याचे पुनियाने सांगितलेय. हे सारे सरकारच्या विरोध प्रदर्शनामुळे घडलेय. माझ्यावरील कारवाई हीसुद्धा सरकारी यंत्रणेकडूनच करण्यात आल्याचेही तो म्हणाला.