औरंगजेबावरून बेरंग! कबर नेस्तनाबूत करण्याचा इशारा, राज्य सरकारकडून परिसराला पोलिसांचे संरक्षण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने रत्नपूर येथील मोगल शासक औरंगजेबाची नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला आहे. धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनीही कबर नष्ट करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रखर हिंदुत्ववादी फडणवीस सरकारने औरंगजेबाच्या कबरीला खास पोलिसांचे संरक्षण दिले आहे.

समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता’ असे विधान करून नाहक वादाला तोंड फोडले. त्यानंतर वेगवेगळय़ा हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची रत्नपूर येथील कबर उखडून फेकण्याची मागणी केली. फडणवीस सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि मिंध्यांचे प्रवक्ते संजय शिरसाट हे मागणी करण्यात आघाडीवर होते. आज पुण्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेत औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करा नसता बाबरी मशिदीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा दिला. 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.

कबरीभोवती पोलिसांचे कडे

वेगवेगळय़ा हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर फडणवीस सरकारने कबरीला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कबरीच्या परिसरात एसआरपीच्या दोन अतिरिक्त तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत. कबर परिसरात मोबाईल तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक साधने घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून या ठिकाणी येणाऱ्यांची नोंद पोलिसांकडून ठेवण्यात येत आहे.

  • कबरीला हानी पोहोचवणारास तीन महिन्यांची कैद किंवा पाच हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. पुरातत्व विभागाचे नियुक्त कर्मचारी तसेच या कबरीचे पारंपरिक सेवेकरी या ठिकाणी असतात. प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थाने अधिनियम 1959 च्या नियम 32 नुसार कबरीच्या 100 मीटरपर्यंत आणि परिसरात 200 मीटरपर्यंत खोदकाम, बांधकामास प्रतिबंध घालण्यात आला आहे.