
बजाज ऑटोचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मधुर बजाज (63) यांचे आज ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. प्रकृतीच्या कारणास्तव बजाज यांनी 24 जानेवारी 2024 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
मधुर बजाज यांनी सुरुवातीचे शिक्षण डेहराडून येथील दून स्कूलमधून घेतले. 1973 मध्ये मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून बी.कॉम. केले. 1979 मध्ये त्यांनी आयएमडी, लॉसाने येथून एमबीए पदवी प्राप्त केली. त्यांना इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ऑफ इंडियाने ‘विकास रतन’ पुरस्काराने सन्मानित केले. मधुर बजाज यांचा उद्योग आणि सामाजिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग होता. त्यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड ऑग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष म्हणून काम केले. ते कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे राष्ट्रीय परिषदेचेही सदस्य होते.
मराठवाडय़ातील वाळूजमध्ये बजाज ऑटो कंपनीचा प्रकल्प उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कामगारांच्या भावना ते समजून घेत होते, अशा शब्दांत भारतीय कामगार संघटनेचे सरचिटणीस, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचीक यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.