![baipan-bhari-deva](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/06/baipan-bhari-deva-696x447.jpg)
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक चित्रपट री-रिलीज होत आहेत. ‘ये जवानी है दीवानी’, ‘सनम तेरी कसम’, ‘तुंबाड’, ‘रॉकस्टार’ यासारखे चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावरही घेतले. हाच ट्रेंड आता मराठी चित्रपटसृष्टीतही येत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर सिनेमा ‘बाईपण भारी देवा’ सिनेमागृहांमध्ये पुन्हा रिलीज होत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी (7 मार्च) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. सहा बहिणींच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल 12.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 76.50 कोटींची कमाई केली होती. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला होता. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.
‘बाईपण भारी देवा’ हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी आमच्या संपूर्ण टीमवर केलेला प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूपच स्पेशल आहे. हा चित्रपट सिनेमागृहांत पुन्हा अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्त पुन्हा प्रेक्षक आवर्जुन सिनेमागृहांत आपल्या सख्यांना घेऊन जातील. नवीन प्रेक्षक मनोरंजनाच्या या उत्सवात सामिल होतील अशी खात्री दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या चित्रपटामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब चौधरी आणि सुकन्या कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले असून वैशाली नाईक यांनी कथा-पटकथा लिहिली आहे. साई – पियूष या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.